
सातारा, दि. १२ जुलै | हैबत आडके
राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये नेतृत्व बदलाची औपचारिक घोषणा झाली आहे. पक्षाचे दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी आक्रमक आणि युवा चेहरा म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
ही घडामोड केवळ एक पदबदल नाही. तरुण नेतृत्वाकडे पक्षाचे नियंत्रण सोपवून संघटनात्मक स्तरावर नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.
जयंत पाटील यांची माघार – शरद पवार यांची नवी दिशा?
१० जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनानंतर जयंत पाटील यांनी पदमुक्ततेची विनंती केली होती.
१० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनीच जयंत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना पदमुक्त करण्याची विनंती केली होती. त्याबाबत मागील काही महिन्यांपासून गटातील संघटनात्मक पातळीवर अंतर्गत चर्चा सुरू होत्या. याचा परिणाम म्हणून अखेर जयंत पाटीलांनी आपला कार्यकाळ पूर्ण करत प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि शरद पवार यांचे दीर्घकाळचे सहकारी असलेले पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्यामागे आणि पक्षाला नवा चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून देण्यामागे पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची पुढची रणनीती असू शकते, अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
जयंत पाटील – एक कालखंड!
सांगली जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या स्थापनेनंतर पक्षाचे प्रथम प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी उचलली. त्यांच्या नेतृत्वात अनेक संघटनात्मक निर्णय, कार्यकर्त्यांचा उत्साह, आणि प्रदेशभर पक्षाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र आता पक्षाने नव्या नेतृत्वाकडे पक्षाची धुरा सोपवली आहे.
शशिकांत शिंदे — तरुण, आक्रमक आणि तळमळीचा चेहरा…
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले शिंदे हे माथाडी चळवळीतून राजकारणात आलेले एक खमके नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला आक्रमकपणा, प्रश्नांवर बेधडक भूमिका आणि जनतेशी थेट संपर्क याची जोड आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध निवडणूक लढवली होती. ती मोहीम जरी यशस्वी ठरली नसली, तरी त्यांची पक्षनिष्ठा आणि लढाऊ वृत्ती अधोरेखित झाली होती. शिंदे यांचा साताऱ्यासह नवी मुंबईतही प्रभाव आहे.
संघटनात्मक बदल – स्थानिक निवडणुकांसाठी तयारी?
हा खांदेपालट केवळ एक पदलालसा नसून पक्षाच्या नव्या योजनेचा भाग मानली जात आहे. शशिकांत शिंदे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर पुन्हा जोमाने पक्ष उभा करण्याची आणि ग्रामीण महाराष्ट्रात प्रभाव वाढविण्याची क्षमता आहे. शरद पवार गट आता नव्या नेतृत्वाकडे वळल्याने, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटना बळकट करण्याचाही मार्ग स्पष्ट होतो आहे. शिंदेंसारख्या तरुण नेतृत्वाकडे सूत्रं दिली जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याची पक्षाची रणनीती स्पष्ट दिसतेय.
शरद पवार गटामध्ये घडलेला हा नेतृत्वबदल येत्या राजकीय रणधुमाळीत निर्णायक ठरू शकतो. जयंत पाटलांनंतर शिंदेंकडे सूत्रं दिल्याने, राष्ट्रवादीत आता नव्या आक्रमक टप्प्याची सुरुवात झाली आहे.
पक्षाचे ‘तरुण तडफदार नेतृत्व’ आता प्रत्यक्ष रणांगणात काय कमाल करतेय, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे!