कराडच्या शेणोलीत पडली ठिणगी, राज्यभर उसळतोय स्मार्ट मीटर विरोधात असंतोष

कराड प्रतिनिधी, दि. ७ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
वीज महावितरण कंपनीकडून राज्यभरात जुन्या वीजमीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू असतानाच, कराड तालुक्यातील शेणोली गावात या मोहिमेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असून याच गावातून राज्यव्यापी असंतोषाची ठिणगी पेटली आहे.
राज्यात वाढत चाललेल्या स्मार्ट मीटरविरोधी असंतोषाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील शेणोली गावात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे. भंडारा, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात आंदोलनं उभा राहत असताना, कराड तालुक्यातील शेणोलीतील ग्रामस्थांच्या ठरावाने या असंतोषाला अधिक बळ मिळणार असल्याचं समोर येत आहे.
शेणोली गावकऱ्यांनी आज एकत्र येत महावितरणच्या जबरदस्तीला विरोध करत, ग्रामसभेपर्यंत मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवण्याचा ठराव पारित केला. या ठिणगीचा परिणाम सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक गावांमध्ये जाणवणार असल्याचं दिसतंय.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची आर्थिक लूट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्मार्ट मीटर बसवणे ही ‘ग्राहकांची संमती’ या तत्त्वावर आधारित प्रक्रिया असावी, असा आग्रह शेणोलीच्या ग्रामस्थांनी धरला असून, ही भूमिका आता इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
कराड तालुक्यातील शेणोली गावात वीज महावितरण कंपनीकडून जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु असतानाच ग्रामस्थांनी याला जोरदार विरोध दर्शविला. संपूर्ण गावाने एकत्र येत, येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेपर्यंत ही प्रक्रिया थांबवावी, असा ठराव घेतला आहे.
स्मार्ट मीटरमुळे इतर गावांमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानाच्या तक्रारींचा दाखला देत ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तातडीने ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली. यावेळी मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली, मात्र शासन निर्णय, ग्राहक हक्क व धोरणांबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
या बैठकीत अंकुश कणसे यांनी ग्राहकांना मीटर बदलण्याचा स्वेच्छेचा अधिकार असल्याची भूमिका मांडली. तर विद्याधर गायकवाड यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे दाखले देत उपस्थित ग्रामस्थांना संघटितपणे लढा देण्याचे आवाहन करत आंदोलनात्मक निवेदनाचे वाचन केले.
सतीश कणसे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणावर अंतिम निर्णय ग्रामसभेतच घेतला जाईल. तोपर्यंत कोणत्याही घरात स्मार्ट मीटर बसवू नये. यानंतर स्मार्ट मीटरच्या विरोधात ठाम निर्धार व्यक्त करत गावकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला.
या बैठकीस सरपंच नारायण शिंगाडे, माजी सरपंच जयवंत कणसे, संतोष कणसे, शरद सूर्यवंशी, सुधीर कणसे, दिलीप कणसे, आनंदराव खुडे, संदीप गिरी, स्वप्निल गायकवाड, तानाजी सूर्यवंशी, सुहास कणसे, वैभव कणसे, अमोल कणसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या वतीने कनिष्ठ अभियंता ज्ञानदेव गुरव, वैजनाथ केंद्रे व विभागीय कनिष्ठ अभियंता माधुरी येडगे या बैठकीस उपस्थित होत्या. गावकऱ्यांनी बैठकीत घेतलेल्या स्थगन निर्णयाचे निवेदन माधुरी येडगे यांच्याकडे देण्यात आले.
यानंतर सतीश कणसे, विद्याधर गायकवाड, सुनील कणसे, संदीप गिरी, पवन पाटील, शुभम कणसे यांच्यासह माजी सरपंच जयवंत कणसे उपस्थित होते. दरम्यान, विद्याधर गायकवाड यांनी मुंढे ता. कराड येथील वीज वितरण उपअभियंता ग्रामोपाध्याय यांना ही स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध असल्याचे निवेदन दिले.
ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामसभेच्या निर्णयापर्यंत शेणोलीत स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.