नवमतदारांच्या नोंदीसाठी ज्येष्ठांनी प्रोत्साहन द्यावे
तहसीलदार खोत : अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक अभियानची मासिक सभा संपन्न
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांची मतदार म्हणून नोंद करण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शिराळा तालुक्याच्या तहसीलदार खोत यांनी केले.
अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान सांगली यांचे तर्फे शिराळा येथे झालेल्या तालुका मासिक सभेत त्या बोलत होत्या. सांगली जिल्हा अर्थक्रांती जीवनगौरव अभियानचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील, सम्राट शिंदे, जिल्हा सल्लागार अॅड. किरण पाटील, वाळवा तालुका प्रतिनिधी बी. एन. नेवरीकर, सांगली जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार खोत यांनी जेष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन, आपापल्या घरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातु आणि नातींची नावे मतदार यादीत नोंदणी करण्याविषयी आवाहन केले.
जगन्नाथ मोरे-पाटील म्हणाले, ज्येष्ठांच्यासाठी हा चाललेला लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. प्रत्येक साठ वर्षावरील जेष्ठ नागरिक हा राष्ट्रीय संपत्तीच आहे, त्यांना सन्मानाने जगता यावे .यासाठी आम्ही सांगली येथे कलेक्टर ऑफिसवरती ज्येष्ठ नागरिक दिंडी काढणार आहोत. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
सम्राट शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्या सांगून प्रस्तावना केली. त्याचप्रमाणे यादव अण्णा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. जिल्हा सल्लागार अॅड. किरण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शिराळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून ज्येष्ठ नागरिकांच्या सभेची सांगता झाली.