मुंबईच्या उल्हास ट्रस्टकडून ‘या’ नामांकित शिक्षण संस्थेच्या 35 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार मिळालेल्या बेलवडे बुद्रुकच्या शिक्षकांचा झाला सत्कार
चांगभलं ऑनलाइन | कासेगाव प्रतिनिधी
जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्व काही प्रयत्न केल्यानंतर शक्य होते. जगातील संशोधनांमध्ये खेडेगावातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याचे मत उल्हास ट्रस्ट मुंबईचे समन्वयक श्री प्रफुल्ल चव्हाण यांनी केले. ते कासेगाव शिक्षण संस्थेच्या आझाद विद्यालय कासेगावमध्ये आयोजित उल्हास ट्रस्टच्यावतीने आयोजित शिष्यवृत्ती चेक वितरण कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
मुंबईच्या उल्हास ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअरमध्ये अग्रेसर असावे , असे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेचा वापर शालेय खर्चासाठी करावा, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी आझाद विद्यालय कासेगाव, वाटेगाव हायस्कूल वाटेगाव, ब्रह्मदास विद्यालय बेलवडे बुद्रुक, श्री वाटेश्वर कन्या शाळा वाटेगाव मधील एकूण ३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार यांनी समन्वयक प्रफुल्ल चव्हाण, वेदिका चव्हाण, तसेच आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त ब्रह्मदास विद्यालय बेलवडे बुद्रुकचे सहाय्यक शिक्षक पी. टी. पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला.
विद्यालयाचे कार्याध्यक्ष एच. डी. गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक नितीन जाधव यांनी केले. नितीन वीरभक्त सर यांनी आभार मानले.