अनुसूचित जाती आरक्षण प्रश्नावर राज्यभर आंदोलन करणार
दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांची घोषणा
चांगभलं ऑनलाइन | बुलढाणा प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रश्नावर फार मोठी चळवळ उभी राहत आहे. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय दलित महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर केला आहे. दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
बुलढाणा येथील हॉटेल रामा ग्रँड या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ५९ जाती असून यांच्यासाठी एकूण १३ टक्के आरक्षण आहे. मात्र या प्रवर्गातील ज्या प्रभावी जाती आहेत अशा दोन-तीन जातीच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे इतर सर्व जातीवर अन्याय होत आहे. त्या जाती विकास प्रक्रियेपासून दूर आहेत. म्हणूनच दलितां मधील दलितांसाठी, वंचितांमधील वंचित जाती समूहासाठी अ ब क ड असे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी १५ जानेवारी पासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, जालना, औरंगाबाद, परभणी, बीड, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुनील अवघडे (सोलापूर ), बापूराव उदारे (बीड), सखाराम रणपिसे (जालना), पांडुरंग खिलारे (पंढरपूर), बळीराम रणदिवे (सांगली), बालाजी कांबळे (लातूर), शिवाजी बुलाखे (अहमदनगर) अशा प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील तसेच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे यांनी दलित महासंघाच्या वाढीसाठी काय करता येईल, याविषयीची चर्चा केली.
सदर बैठकीमध्ये बहुजन समता पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी वसंतराव सकट यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक प्रकाश वायदंडे यांनी केले तर आभार किशोर सूर्यवंशी यांनी मानले.