साताऱ्याला उपसंचालक अँण्टी करप्शनच्या सापळ्यात

चांगभलं ऑनलाइन | सातारा
दोन कंपन्या मधील कामगारांच्या वैद्यकीय तपासणी केलेल्या रक्कमेतील ३० टक्के रकमेची लाचेची मागणी करून तडजोडीअंती १७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा येथील कामगार विभागाचा उपसंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडला. नंदकिशोर आबासाहेब देशमुख, वय ४५ वर्ष, पद- उपसंचालक (वर्ग-१), कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, सातारा, रा. विंडवड्स सोसायटी, वाकड, पुणे, असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रमाणित शल्यचिकित्सक यांनी तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील माहिती अशी, तक्रारदार हे प्रमाणित शल्यचिकित्सक असून त्यांनी एम. आय. डी. सी. मधील दोन कंपन्यांमधील कामगारांची वैद्यकीय तपासणी केलेल्या एकुण ५८,४०० रुपये बिलाच्या ३० टक्के प्रमाणे एकुण १७,५२० रुपये पैकी तडजोडीअंती लोकसेवक नंदकिशोर देशमुख यांनी तक्रारदार यांचेकडे दि.०१ डिसेंबर २०२३ रोजीच्या पडताळणी दरम्यान १७ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर गुरूवार, दि.७ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत संशयीत नंदकिशोर देशमुख यांना १७ हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, हवालदार गणेश ताटे, तुषार भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने केली.