सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे.
या जलरथाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्य अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने व लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा करणे, प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन द्वारे 55 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, घनकचरा सांडपाणी व प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनां विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
ग्रामस्थांचा पाणीपुरवठा योजना चालवणे, पाण्याचे स्त्रोत बळकट करणे या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करणेत आली आहे.
गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत. तसेच नियुक्त केलेल्या समन्वयक मार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. या शुभारंभ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे , कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्के, कार्यकारी अभियंता( म जि प्रा ) पल्लवी चौगुले, जिल्हा पाणी व स्वच्छता कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.