सातारा हा महाराष्ट्राची ओळख आहे – उदयनराजे भोसले
ट्रिपल लेयर मायक्रो प्लॅनिंग करूया - ना. शंभूराज देसाई ; कराडला महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा हा महाराष्ट्राची ओळख आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राबरोबरच देशाला दिशा देण्याचे काम केले. अशा या जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण आजवर लोकहितासाठी राजकारण नव्हे तर समाजकारणच केले आहे. यापुढेही ते करत राहू, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, सातारा हा जाणता राजाला मानणारा जिल्हा आहे. असं असलं तरी गाफील राहून चालणार नाही, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ट्रिपल लेयर मायक्रो प्लॅनिंग करावे लागेल , अशी सूचना पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केली.
कराडजवळच्या विजयनगर येथे कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम , मनोज घोरपडे, सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, सुनील काटकर, चित्रलेखा माने-कदम, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, जयवंत शेलार, भीमराव पाटील, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, अक्षय मोहिते, सुलोचना पवार , पंजाबराव देसाई, विजय पवार, पै. धनाजी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, एकेकाळी दोन माणसांचा पक्ष असं म्हटलं जाणारा भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या पक्षाच्या माध्यमातून आपण अनेक कामे जिल्ह्यात यापूर्वी केली आहे. समाजहित हे ध्येय असेल तर लोकांना एकत्र आणण्यासाठी दबावाची गरज नसते. 2019 ला आपण तडकाफडकी निर्णय घेतला. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. पण मनात पाप नसेल तर देव साथ देतो आणि लोकंही साथ सोडत नाहीत याचा प्रत्यय आज येतो आहे. मतदान जवळ येईल तशा अफवा उठवल्या जातील, मात्र लोकांनी अफवांना बळी पडू नये , असे सांगत यावेळी महायुतीच्या उमेदवाराच्या मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवूया , असे आवाहनही उदयनराजेंनी केले.
शंभूराज म्हणाले, आम्ही 40 आमदारांनी मोठं धाडस केलं. पण त्यावेळी पुढे काय होईल हे माहीत नव्हतं. आमचे 40 ते 50 आमदार असताना आणि भाजपचे 160 आमदार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आमच्या नेत्यालाच थेट मुख्यमंत्रीपदाची संधी देत या धाडसाचे कौतुक केले. आम्हीही ज्या नेत्यावर विश्वास ठेवला त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या राजकीय भवितव्याला कुठेही ठेच पोचू नये याची तंतोतंत काळजी घेतली. महाराष्ट्र शासनाने शेकडो योजना राबवल्या आहेत, पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
सातारा हा जाणत्या राजाला मानणारा जिल्हा आहे, हे जरी खरं असलं तरी गाफील राहून चालणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करतो तसे ट्रिपल लेयर मायक्रो प्लॅनिंग प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपणाला करावे लागेल. दिलेली जबाबदारी प्रत्येक घटक व्यवस्थितपणे पार पाडतोय का नाही हे तपासण्याची वेगवेगळी यंत्रणा असली पाहिजे, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली.
सातारा मतदारसंघातून महायुती मधून लोकसभेला मी इच्छुकच आहे , उदयनराजेंसारखी आमची दिल्लीत फील्डिंग नाही. आम्ही भाजपाचे प्रदेश कार्यालय, सागर बंगला आणि जिल्हा कार्यालयाच्या संपर्कात आहोत, उमेदवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर झाली नसल्याने अजूनही मला आशा आहे असे सांगून माथाडी नेते ना. नरेंद्र पाटील म्हणाले, महाराज जेथे उभे, तेथे सगळे आडवे असं होतात. गत वेळी मी त्यांच्या विरोधात होतो, पण आज त्यांच्या बाजूने उभा आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत उघड बोलणे टाळले पाहिजे, असे सांगून उदयनराजेच भाजपाचे अर्थात महायुतीचे उमेदवार असतील आणि त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी या निवडणुकीची जबाबदारी घ्यावी. कारण निवडणूक जिंकल्यानंतर पालकमंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची गेलेली जागा परत आली असा संदेश सर्वत्र जाणार आहे. या निवडणुकीचा गुलाल हा कराड व पाटण तालुक्यावर अवलंबून आहे, हे ओळखून दोन्ही तालुक्यातील नेते, कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रस्ताविकात संयोजक डॉ. अतुल भोसले म्हणाले, देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या सरकारकडून सुरू आहे. विविध योजना राबवून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात हातभार लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. कराड दक्षिण मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. पक्ष संघटनेची मजबूत बांधणी आहे. त्यामुळे आपण पालकमंत्र्यांना शब्द देत आहोत की महायुतीच्या उमेदवाराला कराड दक्षिण मतदारसंघातून मोठी आघाडी देऊ. राजेंद्रसिंह यादव यांनी आभार मानले.
सर्वांना मिसळ खायला घेऊन जाणार…
उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना गत निवडणुकीची आठवण करून देत चिमटा काढला. ते म्हणाले , “नरेंद्र पाटलांनी गेल्या वेळी मला मिसळ खायला नेले नाही. पण आज व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना मी मिसळ खायला नेणार आहे “, उदयनराजेंच्या या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला.
जे काय ठरवायचं ते तुम्हालाच!
या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घ्यावी, असं मत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर , “भाऊ-भाऊ साताऱ्यातून येताना ठरवून आलेत की सगळं पालकमंत्र्यांच्या गळ्यात घालायचं, पण सगळं माझ्यावर सोपवू नका” अशी कोपरखळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हाणली. हाच धागा उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या भाषणात पकडला आणि ते म्हणाले, “आम्ही काहीही ठरवलेलं नाही, काहीही ठरलेलं नाही, आता जे काय ठरवायचंय ते तुम्हालाच ठरवायचंय!” उदयनराजेंच्या या वक्तव्यावर मोठी खसखस पिकली.
विशेष सूचना – या बातमीचे व्हिडिओ तुम्हाला ‘Changbhala News‘ या YouTube channel वर पाहता येतील.