जोतिबा देवाच्या मानाच्या निनाम येथील सासनकाठीचे उंब्रजमध्ये जोरदार स्वागत

चांगभलं ऑनलाइन | उंब्रज प्रतिनिधी
क्षेत्र जोतिबा देवाच्या यात्रेवरून आलेल्या निनाम ता. सातारा येथील मानाच्या सासनकाठीचे उंब्रज ता. कराड येथे शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. उंब्रज येथील स्वामी समर्थ मंदिराचे कार्यवाहक कमलाकर पाटील व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात सासनकाठीचे जोरदार स्वागत केले. स्वामी समर्थ मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
निनाम ता. सातारा येथील सासनकाठीला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. श्री जोतिबा देवाची यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथे ही सासनकाठी दाखल झाली होती. यात्रेनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या सासनकाठीचे शुक्रवारी सायंकाळी उंब्रज येथे आगमन झाले. या सासनकाठीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी रांगोळीचा सडा टाकून सासनकाठीचे पुजन करण्यात आले. सासनकाठी सोबत आलेल्या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मंदिर येथे सासनकाठी दाखल होताच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. स्वामी समर्थ मंदीराचे कार्यवाहक कमलाकर पाटील, सौ. सुजाता पाटील व स्वामी भक्तांनी यावेळी परिश्रम घेतले. तसेच निनामच्या ग्रामस्थांनी जोतिबा यात्रा व सासनकाठीच्या परपंरेविषयी यावेळी माहिती दिली.