
कराड प्रतिनिधी, दि. २ | चांगभलं वृत्तसेवा
घनदाट जंगलं… धुक्याचं कवडस… अंगावर काटा आणणारी थंडी… हिरव्या गवतातून न दिसणारे साप, रक्त शोषण करणाऱ्या जळवा, गढवळलेल्या चिखल मिश्रित पाण्यातून जाणाऱ्या पायवाटा, आणि जंगली प्राण्यांचा वावर…‘पन्हाळा ते पावनखिंड’!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महासुटकेचा हा ऐतिहासिक मार्ग कराड येथील सरस्वती विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी २ दिवसांची थरारक पदभ्रमंती करून प्रत्यक्ष अनुभवला.
कराडच्या जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली “पन्हाळा ते पावनखिंड” ऐतिहासिक अभ्यास पदभ्रमंती मोहिम ही केवळ एक ट्रेक नव्हे, तर स्वराज्याच्या इतिहास नसानसात भिनणारी एक थरारक अनुभूती ठरली.
छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळा ते विशाळगड सुटका, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान, आणि घोडखिंडचा इतिहास या घटनांचा अभ्यास फक्त पुस्तकात न राहता विद्यार्थ्यांनी तो स्वतःच्या पावलांखालून अनुभवला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, सचिव अनिल कुलकर्णी व मुख्याध्यापिका सोनाली जोशी यांच्या प्रेरणेने व समन्वयक विजय कुलकर्णी व स्वाती जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक अभ्यास मोहिमेचं आयोजन करण्यात आलं.
इतिहास अभ्यासक स्वप्निल जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रत्येक ऐतिहासिक बिंदूवर थांबत त्या घटनेचा अभ्यास केला. पन्हाळा किल्याचा ऐतिहासिक संदर्भासह अभ्यास करून वीररत्न शिवा काशीद समाधी दर्शन व बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास वंदन करून या मोहिमेस प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने पन्हाळा किल्यातून बाहेर पडले त्या राजदिंडी मार्गावरून पायी चालत सुरुवात करण्यात आली.
प्रत्येक पावलागणिक थरार…
दाट जंगलं, चिखलाचे रस्ते, काटेरी वेली, आणि धुक्याचं साम्राज्य – यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांनी ‘राजदिंडी मार्गावरून’ प्रवास केला.
जळू चिकटले तरी भीती न बाळगता हळदीचा वापर करून स्वतः उपचार करणं, खेकडे पकडण्याचं प्रात्यक्षिक, आणि साप-कोल्ह्यांचं थरारक दर्शन – यामुळे निसर्गाशी मैत्री झाली.
मसाई पठारावरील थंडी, गार वारा आणि घनदाट धुक्यातून वाटचाल करत, पावनखिंडचं दर्शन घेतल्यावर विद्यार्थ्यांनी डोळे पुसले… ‘हा इतिहास आमचा आहे’ हे मनोमन कबूल केलं.
शिक्षणाचा जिवंत अनुभव…
इतिहास म्हणजे फक्त आठवणी नव्हेत, तर जगण्याजोगा अनुभव असल्याचं विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं.
प्रत्येक ओढा, वेल, चिखल आणि पावसाची थेंबही जणू काही इतिहास बोलत होता!
उपक्रमाबद्दल शाळेचं कौतुक….
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाबद्दल उपक्रमाबद्द्ल संस्थेचे संचालक श्रीकृष्ण ढगे, दीपक कुलकर्णी, नितीन गिजरे, सुनील मुंद्रावळे, गीतांजली तासे, श्रीपाद कुलकर्णी सर्व संचालक व पालकांनी शाळेचं कौतुक व आभार व्यक्त केलं.