संजय कापूरकर यांचा राष्ट्रीय गोमंतक पुरस्काराने सन्मान
सामाजिक कार्याची हुतात्मा संस्थेकडून दखल

कराड | प्रतिनिधी
कराडच्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेकडून संजय रंगराव कापूरकर यांचा राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार 2023 ने नुकताच गोवा येथे सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रामध्ये कापूरकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श समाजसेवक’ म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कापूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संजय कापूरकर हे विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे यांनी राष्ट्रीय गोमंतक गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा येथील खा. नरेंद्र सावईकर, गोवा सरकारच्या बस महामंडळाचे अध्यक्ष आ. उल्हास तुयेकर, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या विधीज्ञ आशा देसाई, जिल्हा परिषद संघ रत्नागिरीचे उपाध्यक्ष उदय बने, पुणेचे विशेष अधीक्षक डॉ. जालिंदर महाडिक, सातारा येथील उद्योजक विशाल मोरे, चिपळूण येथील उद्योजक डॉ. विजय माटे, स्वागताध्यक्ष जयेश नाईक, हुतात्मा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे, सल्लागार जयवंत घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय कापूरकर यांना राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवड समितीचे सदस्य शरणाप्पा अचलेर, जनार्दन प्रताप, संजय पोळलेकर, संजय बने, प्रशांत रत्नपारखी, अमित अवघडे, दिलीप मेस्त्री, सायली मिरजकर यांच्यासह हुतात्मा संस्थेचे सर्व सदस्य महाराष्ट्र व गोवा येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल संजय कापूरकर यांचे विमा सल्लागार विनोद मोहिते, उद्योगपती चंद्रकांत जाधव, प्रा. आनंदराव जानुगडे, उद्योगपती धोंगडी, नजीर मुल्ला यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.