संत तुकोबारायांची भंडारा भामचंद्र डोंगर ही तपोभूमी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच संरक्षित
वारकऱ्यांच्या संतभूमी संरक्षक समितीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर केला पाठिंबा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने पाठिंब्याचे पत्र दिले आहे. या पत्रामध्ये समितीने नमूद केले आहे की, आ. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संतभूमीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून त्यामुळे श्री क्षेत्र देहू जवळील संत तुकोबारायांची ध्यान साधना तपोभूमी भंडारा भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून सन २०११ला शासनाकडून घोषित झाले. या संपूर्ण पवित्र क्षेत्राला आज सुरक्षितता मिळाली आहे.
दरम्यान, श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला. तसेच आ. चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण यांचा वारकरी शाल, तुळशीचा हार घालून समितीकडून सत्कार करण्यात आला.
समितीने आ. चव्हाण यांना दिलेल्या पाठिंबा पत्रामध्ये म्हटले आहे की, संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने सदर न्याय्य अधिसूचनांचे कायदेशीर अद्यादेश काढण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. परंतू आ. चव्हाण यांच्यानंतर कोणत्याच सरकारने याबाबत संवेदनशीलपणा दाखवला नाही. त्यामुळेच यासाठी वारकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मात्र, हे पवित्र काम आपणच पूर्ण करू शकाल, असा विश्वास दर्शवत त्यासाठी आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे , अशा आशय समितीने दिलेल्या पाठिंबा पत्रामध्ये नमूद केला आहे.