कराडला ऊसदराच्या मागणीसाठी रयत क्रांती मैदानात – changbhalanews
शेतीवाडी

कराडला ऊसदराच्या मागणीसाठी रयत क्रांती मैदानात

शुक्रवारी बनवडी फाट्यावर आंदोलन : सचिन नलावडे करणार नेतृत्व

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल ३५०० रूपये व मागील वर्षीचे दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना दिले आहे.

गेल्या एक वर्षभरापासून बाजारपेठेमध्ये साखरेचे दर ३६ रुपये च्या आसपास स्थिर राहिले आहेत व यावर्षी ३८ ते ३९ रुपये साखरेला भाव मिळत आहे. तसेच साखर कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती डिस्टलरी अल्कोहोल असे द्वितीय पदार्थ घेतल्याने त्याचाही फायदा कारखान्यांना झाला आहे. माळेगाव व सोमेश्वर या साखर कारखान्यांनी ११.८० उतारा असताना एफआरपी पेक्षा ५५० रूपये ते ३५० रुपये जास्त दिले आहेत. मग जिल्ह्यातील कारखान्याचा उतारा साडेबाराच्या आसपास असताना एफआरपी पेक्षा जास्त पैसे का दिले नाहीत, या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच दुधाला सरकारने जाहीर केलेला भाव सध्या मिळत नाही. लिटरला पाच ते सात रुपये कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे. म्हणून दुधाला ३५ रुपये हमीभाव मिळावा ही मागणी सुद्धा या आंदोलनात करण्यात येणार आहे

शेतकऱ्यांनो, मागितल्याशिवाय कोणी देणार नाही…

कराड भागातील शेतकरी हा क्रांतिकारक विचाराचा आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी ३५०० रूपये उसाचा दर घेत असेल तर आपला शेतकरीही मागे राहणार नाही. त्याला सुद्धा असाच उसाचा भाव मिळवून द्यायचा आहे, म्हणून शेतकऱ्यांनी गट, तट, पक्ष विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे.
सचिन नलावडे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,
रयत क्रांति संघटना.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close