सातारा | हैबत आडके
“सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?…” या बालगीताच्या धर्तीवर शाळेच्याच गणवेशात आलेल्या 35, 40 आणि 50 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सातारा (Satara) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात “सांग… सांग…एकनाथ शाळा टिकेल काय..?” हे विडंबनात्मक गीत म्हणत राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. हे विद्यार्थी कोणा शाळेचे नव्हे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्या आंदोलनाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळा बाबत घेतलेला निर्णय शिक्षण क्षेत्राला धोकादायक आहे, असा दावा करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज साताऱ्यात शाळेच्या गणवेशात येवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे अनोखे आंदोलन केले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विडंबनात्मक बालगीत सादर करत टीकेची झोड उठवली. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावरही कार्यकर्त्यांनी तिखट टीका केली. या आंदोलनासाठी आरपीआयचे पुरुष कार्यकर्ते खाकी हाफ पॅंट व पांढरा शर्ट अशा गणवेशात तर महिला कार्यकर्त्या विद्यार्थिनींच्या गणवेशांमध्ये आल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यालयाबाहेर बसून जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारने सरकारी शाळांबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध केला.