टेंभू अनाथाश्रम सेक्स रॅकेट प्रकरणात कराड ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर ; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पोलीस पथकाची स्थापना

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील टेंभू येथे पोलिसांनी कारवाई केलेल्या व अनाथ आश्रमाच्या चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा कराड ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करून महिलेसह दोघांना अटक केली होती. महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या या सेक्स रॅकेटची पाळेमुळे खाणून काढण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सहभाग निष्पन्न होणाऱ्या कोणाचीही गय न करता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी,
कराड तालुक्यातील टेंभू येथे अनाथ आश्रमाच्या नावाखाली आश्रम चालक महिलेकडून निराधार महिलेला जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना 20 ऑगस्ट 2024 रोजी मिळाली होती. त्यावरून कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप , सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक टेंभू येथे पोहोचले. या पथकाच्या चौकशीतून तेथील अनाथ आश्रमात एक वृद्ध महिला व तिची मतिमंद नात गेल्या दहा वर्षापासून राहत असून गेल्या चार वर्षापासून तर दोघीच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांना जी माहिती मिळाली होती, त्यामधील पीडित महिला ही सध्या लोणंद येथे राहत असून ती सध्या सातारा येथे आली असल्याची माहिती मिळाल्याने कराड ग्रामीण पोलिसांनी एक पथक सातारा येथे पाठवून पीडित महिलेला ताब्यात घेऊन कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले होते. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने सर्व आपबीती पोलिसांना सांगितली होती. तिची ओळख झाल्यानंतर अनाथ आश्रम चालक महिलेने तिला अनाथ आश्रमात ठेवून जबरदस्तीने तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्या बदल्यात ग्राहकाकडून पैसे घेतले. दरम्यान , वाल्मीक महादेव माने (रा. म्हासोली, तालुका कराड) याने आश्रम चालक महिलेसोबत संगनमत करून पीडित महिलेवर अत्याचार केला, अशी फिर्याद पीडित महिलेने पोलिसांना दिल्यानंतर तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वेश्याव्यवसाय करवून घेण्यासाठी जबरदस्ती करणारी महिला व वाल्मीक माने या दोघांना विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती.
सखोल तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त…
दरम्यान, या सेक्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढून पाळेमुळे उ त्यामध्ये जेवढ्या लोकांचा सहभाग आढळून येईल त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या विशेष पथकाने या रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता, कोणाची गया न करता ज्या कोणाचा सहभाग निष्पन्न होईल, त्या प्रत्येकावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष पोलीस पथकाने यासाठी कंबर कसून तपास सुरू केला आहे.
…पुढे येऊन तक्रार द्या… पोलिसांचे आवाहन
टेंभू येथील अनाथ आश्रमाच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेट प्रकरणात कोणाची फसवणूक झाली असल्यास किंवा यामधील अत्याचार पीडितांनी पुढे येऊन कराड ग्रामीण पोलिसात तक्रार द्यावी, तसेच या प्रकरणात कोणाला काही माहिती द्यावयाची असेल तर कराड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, संबंधितांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.