
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पटलावर गेल्या दोन दिवसापासून चर्चेत आलेल्या साताऱ्यातील पाटण तालुक्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून मोठा गट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत असतानाच भाजपने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला लाल दिव्याचा सन्मान दिला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड. भरत पाटील यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे. या पदाला राज्य मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे ऍड. भरत पाटील यांच्या गेल्या 35 वर्षाच्या पक्षनिष्ठेचा सन्मान झाला असून पाटण तालुक्याला आणखी एक ‘लाल दिवा’ मिळाला आहे.
एडवोकेट भरत पाटील यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील’ भारत सरकार अंतर्गत करण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील गुढे गावचे सुपुत्र असलेले भरत पाटील हे गेली 35 वर्षे भाजपमध्ये कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर ते काम पाहत आहेत. सातारा जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड समजला जात असताना त्या काळात भाजपची विचारधारा रुजवण्याचे आणि पक्ष बांधणीचे मोठे काम भरत पाटील यांनी सातारा जिल्ह्यात केले. यापूर्वी दोन वेळा त्यांनी भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्याबरोबरच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश , राजस्थान या राज्यात त्यांनी पक्षासाठी पक्ष निरीक्षक म्हणून काम केले आहे.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भरत पाटील हे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक ही लढवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भरत पाटील यांनी प्रभावीपणे प्रयत्न केले होते. त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल घेत त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. सातारा जिल्ह्यात एकीकडे पाटण तालुका हा शिवसेनेचा गड समजला जात असून तालुक्यातील राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पाटण तालुक्याची चर्चा सध्या जिल्ह्यासह राज्यभरात सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्याचे सुपुत्र असलेल्या भरत पाटील यांना लाल दिवा देवून भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे.
दरम्यान, या निवडीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे आदींनी एॅडवोकेट भरत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.