जिल्हा परिषदेकडून 54 योग शिक्षकांची भरती ; ग्रामीण भागात योग प्रात्यक्षिके राबविण्यात येणार
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुष्यमान आरोग्य मंदिर (आयुष) येथे योगशिकांची कंत्राटी 54 पदे भरण्यात आली आहे. या योग शिक्षकांकडून ग्रामीण भागात योग प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांनी दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा यांचे मार्फत पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती त्याआधारे उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व प्रात्यक्षिकांच्या आधारावर एकूण ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व राज्य कार्यालयाकडून मंजूर असलेल्या ५ आयुष्यमान आरोग्य मंदीर आयुष असे एकूण ५४ योग शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवून कंत्राटी नियुक्ती देण्यात आलेली आहेत.
कराड तालुक्यासाठी 7, कोरेगाव तालुक्यासाठी 8, खंडाळा तालुक्यासाठी 2, खटाव तालुक्यासाठी 4, जावळी तालुक्यासाठी 4, पाटण तालुक्यासाठी 2, फलटण तालुक्यासाठी 7, महाबळेश्वर तालुक्यासाठी 1, माण तालुक्यासाठी 4, वाई तालुक्यासाठी 3 व सातारा तालुक्यासाठी 12 असे एकूण 54 योग शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.