
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महायुतीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला येणार याचा पेच कायम असतानाच आजच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्याने निशिकांत पाटील हे इस्लामपूर मधून तर संजयकाका रामचंद्र पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ मधून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी आपल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई मतदार संघातून मकरंद पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे समोर आले होते. या मतदारसंघात भाजपकडून गेल्या काही दिवसापासून गावोगावी प्रचाराचे रान उठवण्यात आले होते. मात्र महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू झाल्यानंतर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाते, याबाबतचा पेच अद्याप कायम आहे.
या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी ) अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे . त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व तासगाव कवठेमहांकाळ या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार महायुतीमध्ये घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसरे यादीतील मतदार संघनिहाय उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार याप्रमाणे-
283 – इस्लामपूर – निशिकांत पाटील
287 – तासगाव कवठेमहांकाळ – संजयकाका रामचंद्र पाटील
272 – अनुशक्ती नगर – श्रीमती सना मलिक
176 – वांद्रे पूर्व – झिशान सिद्दिकी
208 – वडगाव शेरी – सुनील टिंगरे
198 – शिरूर – ज्ञानेश्वर (माऊली) कटके
88 – लोहा – प्रताप पाटील चिखलीकर