चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘त्रिवार जयजयकार’… अशा गीतरामायणातील अजरामर गाण्यांच्या स्वरांनी कराडकर रसिकांची शुक्रवारची (ता. १९) सायंकाळ अध्यात्मिक अनुभूतीने तृप्त झाली. कृष्णा कृषी महोत्सवात स्वरसांगाती कला व अभिव्यक्ती व्यासपीठाच्या कलाकारांनी आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेल्या व महान संगीतकार, गायक सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर ‘गीतरामायण’ कार्यक्रमाचे सादरीकरण करुन रसिकांची वाहवा मिळविली.
ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या दिग्गजांच्या ‘गीतरामायण’ या अलौकिक कलाकृतीचे गारूड आजही कायम असल्याचा प्रत्यय यावेळी आला. उपस्थितांपैकी प्रत्येकच या गाण्यांच्या ओळी उद्धृत करत आजही मराठीजनांना संपूर्ण गीत रामायण मुखोद्गत असल्याची साक्ष देत होता.
‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ या गाण्याने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘सांवळा गं रामचंद्र’, ‘चला राघवा चला’, ‘जेथे राघव तेथे सीता’ आदी गाण्यांतून रामकथा उलगडत गेली. कैकयीवर प्रक्षुब्ध झालेल्या भरताच्या तोंडी असणारे ‘माता न तु वैरिणी’ हे गीत कलाकारांनी अफाट उर्जेने सादर केल्यावर रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘तोडिता फुले ही’, ‘सेतु बांधा रे सागरी’ आदी गाणी सादर झाली.
संयोजक प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अभिषेक पटवर्धन, प्रल्हाद जाधव, प्रसाद कुलकर्णी, डॉ. शीतल धर्माधिकारी, सौ. गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर यांनी ही गीते सादर केली. त्यांना प्रशांत देसाई व संदेश खेडेकर (तबला), अमित साळोखे (हार्मोनियम), शिवाजी सुतार (की-बोर्ड), सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (व्हायोलीन), गुरु ढोले (साईड रिदम) यांनी संगीतसाथ दिली. निवेदक मनीष आपटे यांनी आपल्या ओघवत्या निवेदन शैलीत रामकथा उलगडून सांगितली.
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राम जन्मला गं सखे आणि प्रसादाचे वाटप..
गीत रामायण कार्यक्रमात कलाकारांनी ‘राम जन्मला गं सखे’ हे गीत सादर करायला सुरुवात होताच, संयोजकांच्यावतीने उपस्थित सर्वच रसिकांना प्रसाद म्हणून पेढ्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे सर्वांनाच राम जन्माची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.