अर्थसंकल्पातील तरतूदीमुळे भारावलेल्या भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राख्या
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली.
विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे.
महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतचे निकष मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित
दरम्यान, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामन खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात ही माहिती दिली.
आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला
राज्यातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात ही माहिती दिली आहे.