राजेंद्रसिंह यादव यशवंत विकास आघाडीची भूमिका दोन दिवसात स्पष्ट करणार – changbhalanews
राजकिय

राजेंद्रसिंह यादव यशवंत विकास आघाडीची भूमिका दोन दिवसात स्पष्ट करणार

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गट आपली भूमिका घेत असताना कराडच्या राजकारणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या यशवंत विकास आघाडीचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे आघाडीची भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजकारणात नेहमीच धक्कातंत्राचा अवलंब करणारे राजेंद्रसिंह यादव कराड दक्षिणच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेस पोहोचली आहे.

राजेंद्रसिंह यादव यांनी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी कराड शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने स्मार्ट सिटीचे स्वप्न उराशी बाळगत त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनीही राजेंद्रसिंह यादव यांच्या धडपडीला दाद देत कराड शहरासाठी आजवरच्या इतिहासातील उच्चांकी सुमारे 209 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यात भुयारी गटार योजना व पाणी योजनेचे अद्यावतीकरण याचा समावेश आहे. त्याचे आचारसंहितेपूर्वी भूमिपूजनही करण्यात आले आहे. नगरसेवक म्हणून कराड पालिकेच्या इतिहासात इतका निधी खेचून आणणारे राजेंद्रसिंह यादव हे एकमेव नगरसेवक आहेत.

कराड दक्षिणच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना राजेंद्रसिंह यादव यांनी कोणतीही उघड भूमिका घेणे टाळले होते. राजेंद्रसिंह यादव यांच्यापुढे सध्या निर्णायकी अवस्था असून कराड नगरपालिका व कराड दक्षिण विधानसभा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गेले काही दिवस त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा शहरात सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या सहकारी नगरसेवकांना घेऊन राजेंद्रसिंह यादव आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. राजेंद्रसिंह यादव यांना मानणारा वर्ग कराडमध्ये मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या भूमिकेचा दक्षिणच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दक्षिणेच्या निवडणुकीतील ही महत्त्वाची घडामोड असणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close