राजेंद्रसिंह यादव यांनी कराडच्या विकासासाठी खेचून आणला 209 कोटींचा निधी
कराडची भुयारी गटर योजना व पाणी योजनेसाठी नगरोत्थान महाभियानमधून १६० कोटी ; जिल्हा नियोजन व शासनाच्या अन्य योजनांतून 49 कोटी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी – हैबत आडके
यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडकरांना विकासकामांसाठी निधीची मोठी भेट दिली आहे. कराडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी भुयारी गटार योजना (मलनिःसारण प्रकल्प) व शहरासह वाढीव भागाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अद्यावतीकरणासाठी सुमारे 160 कोटींचा निधी राज्य नगरोत्थान महाभियानमधून मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून 2056 सालापर्यंत कराड शहराची लोकसंख्या गृहीत धरून या दोन्ही योजनांचे अद्ययवतीकरण करण्यात येणार आहे. तर जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांतून सुमारे 49 कोटी असा एकूण 209 कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणला आहे. राजेंद्रसिंह यादव यांच्या गेल्या काही महिन्यांतील अथक पाठपुराव्यामुळे कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे दोन प्रश्न मार्गी लागणार असल्याने कराडकर नागरिकांनी राजेंद्रसिंह यादव यांचे आभार मानले आहेत.
राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीड वर्षापूर्वी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांना कराडच्या विकासासाठी 100 कोटीहून अधिक निधी देऊ, असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले असून कराडकरांना दोन महत्त्वाच्या योजनांच्या अद्यवतीकरणासाठी 160 कोटींची भेट दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी यशवंत विकास आघाडीच्या माजी नगरसेवक व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे व संपर्क प्रमुख शरद कणसे
यांच्या मार्गदर्शनाखाली भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या अद्ययावतीकरणाबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते. कराड शहराची हद्दवाढ झाली असून शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात या दोन्ही योजनांचे अद्यावतीकरण होणार आहे. त्यामुळे कराडच्या नागरीकरणास वेग येणार आहे. कराडची भुयारी गटार योजना सुमारे पन्नास वर्षांपूर्वींची असून या योजनेमुळे कराड नगरपालिकेचा राज्यात लौकिक आहे. तथापि सुमारे पन्नास वर्षांचा कालावधी लोटल्याने या योजनेच्या अनेक पाईप झिजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचे अद्यावतीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. नगरपालिकाही प्रयत्नशील होती. या पार्श्वभूमीवर राज्य नगररोत्थानमधून मूळ शहरातील सध्या अस्तित्वात असलेल्या भुयारी गटार योजनेचे अद्यावतीकरण होणार आहे. तर शहराच्या तिप्पट आकाराने शहरात समाविष्ट झालेले हद्दवाढ भागात नव्या नलिका टाकण्यात येणार आहेत. याबरोबरच शहरातील ड्रेनेज पंपिंग स्टेशनचेही अद्यावतीकरण होणार आहे. यासाठी सुमारे ९६ कोटी २८ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
शहराची 24 तास पाणीपुरवठा योजना अद्याप सुरू झालेली नाही. जुन्या पाण्याच्या टाक्यांसह नवीन टाक्या बांधून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र 2056 सालापर्यंत कराड शहराची लोकसंख्या तीन लाखापर्यंत जाण्याचा अंदाज असून या लोकसंख्येला मुबलक पुरेल इतका पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणी योजना सक्षम असावी, या दृष्टीने पाणीपुरवठा योजनेचे अध्ययवतीकरण होणार आहे. यासाठी सुमारे ६३ कोटी ४८ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
तर जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांतून सुमारे 49 कोटी रुपये निधीही यादव यांनी खेचून आणला आहे. एकूण 209 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
या दोन्ही योजनांचे शासन आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात राजेंद्रसिंह यादव यांना या योजनांचे अध्यादेश प्रदान केले. यादव यांनी कराडकरांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे यांचे आभार मानले.
राजेंद्रसिंह यादवांचा मास्टर स्ट्रोक…
राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे व संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून यादव यांनी विकास कामांचे प्रस्ताव घेऊन महिनोनमहिने मंत्रालयात पाठपुरावा केला होता. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य लाभत होते. कराड शहराचा चौफेर विकास सुरू असला तरी सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची भुयारी गटरी योजना व पाणीपुरवठा योजनेचे अद्यावतीकरण शहराची भविष्यातील वाटचाल लक्षात घेऊन होणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने भुयारी गटर योजनेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणत राजेंद्रसिंह यादव यांनी मास्टरस्ट्रोक मारला असून कराडकर नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
कराड पालिकेच्या इतिहासात प्रथमच एकावेळी प्रचंड तरतूद…
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी कराडच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचा संकल्प केला होता. यासाठी गेले वर्षभर ते अविरत प्रयत्न करत होते. या त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून कराड नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी २०९ कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे. कराड पालिकेच्या इतिहासात इतका प्रचंड निधी एकाच वेळी येण्याचा हा पहिला प्रसंग आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष सहकार्य…
राज्याचे उत्पादन व शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजेंद्रसिंह यादव यांना विशेष सहकार्य केले आहे. कराडचा पाणी प्रश्न निर्माण झाल्यानंतर यादव यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा नियोजनमधून 73 लाखांचा निधी पाईप लाईनसाठी मिळाला. राजेंद्रसिंह यादव यांना जिल्हा नियोजन समितीमधून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. शिवाय कराड नगरपालिकेच्या प्रस्तावांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.