मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव – changbhalanews
राजकियराज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून शुभेच्छा

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यभर आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दिव्यांगाना उपयुक्त सामुग्रीचे वाटप यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

तसेच यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक, पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक यांच्या शुभेच्छांचा विनम्रपणे स्वीकार केला. तयावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना घरांच्या चाव्या, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप तसेच दिव्यांग बांधवांना व्हील चेअर आणि इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा अध्यक्ष हेमंत पवार तसेच शिवसेनेचे ठाणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. श्री. श्री. रविशंकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक, संपादक, पत्रकार तसेच शिक्षण, सहकार, सामाजिक कार्यकर्ते आदींनीही ई-मेल, दूरध्वनी, संदेश यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. समाजमाध्यमांवरून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यावर शुभेच्छा देण्याचा ओघ सुरुच होता.

अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना प्रत्यक्ष भेटूनही शुभेच्छा दिल्या. यात राजकीय, सामाजिक संस्था तसेच विविध संघटना आणि कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी परिसरातील शालेय मुला-मुलींचीही गर्दी झाली होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मध्यरात्रीपासूनच विविध माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत होत्या. मुख्यमंत्र्यांनी कोणताही सार्वजनिक डामडौल न करता अत्यंत साधेपणाने कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा केला. देश आणि विदेशातूनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश, समाजमाध्यमावरून शुभेच्छा देणारी छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती प्रसारीत केल्या गेल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी, आनंदाश्रम, टेंभी नाका, वर्षा शासकीय निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम म्हणून वृक्षारोपणासह, स्वच्छता आणि अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close