दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच मिळतायेत दाखले
कराड तालुक्यात प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाची अंमलबजावणी सुरू

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज महसुल समाधान शिबीर अभियान 2025-26 ची कराड तालुक्यात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांचे अध्यक्षतेखाली अंमलबजावणी गतीने सुरू आहे. या अभियानांतर्गत कराड तालुक्यातील दहावी व बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या तब्बल 16 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा महाविद्यालयातच शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध प्रशासकीय दाखले देण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होत आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कराड तालुक्यातील 131 शाळांचे मुख्याध्यापक, 40 उच्च माध्यमिक महाविदयालयांचे प्राचार्य, 14 मंडल अधिकारी, 46 महा ई सेवा केंद्र चालक व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी बैठक घेऊन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सूचना केल्या होत्या.
सदर बैठकीस कराड तालुक्यातील एकुण 131 शाळामधील दहावीचे 7994 व 40 महाविदयालयातील 8687 विदयार्थ्यांना दाखले वाटप करणेकरिता एकुण 16681 कोरे फॉर्मचे वाटप करणेत आले होते. सदर अभियानांतर्गत उत्पनाचे दाखले, डोमासाईल (रहिवास प्रमाणपत्र), जातीचे दाखले, नॉन क्रिमेलिअर दाखले देण्यात येत आहेत. या दाखल्यांकरिता आवश्यक सर्व कागपत्र संबंधित शाळांमध्ये स्विकारून शाळेतच 28 मे पर्यंत दाखले देण्यात येणार आहेत. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे हे ” समन्वयक अधिकारी” म्हणून कामकाज पाहत आहेत.
सदरचे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबविण्यासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कल्पना ढवळे, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शबनम मुल्ला व श्री नितीन जगताप, तसेच सर्व मंडल अधिकारी, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, निवडणुक नायब तहसिलदार हेमंतकुमार बेसके , नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व महा ई सेवा केंद्र चालक व आपले सरकार सेवा केंद्र चालक परिश्रम घेत आहेत.