चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड-चांदोली रस्त्यावरील घोगाव ता. कराड येथे बेकायदेशीरपणे वाहतूक करण्यात येत असलेल्या 9 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाल्याची (गुटखा) 20 पोती व 4 लाख रुपये किमतींचे अशोक लेलँड छोटा हत्ती वाहन मिळून सुमारे 13 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कराड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी, दि. 18 रोजी दुपारी दोनच्या सुमारास मौजे घोगांव ता कराड गांवचे हददीत कराड-चांदोली रोडवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला (गुटखा) वाहतुक करणाऱ्या एमएच 50 एन 2982 या क्रमांकाचे अशोक लेलंड छोटा हत्ती हे वाहन येणार असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी यांना मिळाली होती.
त्याची खात्री करून घेऊन पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, हवालदार प्रफुल्ल गाडे, सज्जन जगताप, सचिन निकम, संदीप पाटील, धनंजय कोळी, सुनील माने, विनोद माने, नितीन कुचेकर , नाना नारनवर या पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक शासकीय वाहनाने घोगाव येथे पोहोचले. दुपारी दोनच्या सुमारास पथकाला संबंधित छोटा हत्ती अशोक लेलँड वाहन दिसून आले. पथकाने हे वाहन थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा व तंबाखू पुड्या यांची सुमारे वीस पोती आढळून आली. ही सर्व पोती वाहनात पाठीमागच्या बाजूला सुरुवातीला कापसाची पोती ठेवून त्याच्या आतील बाजूस लपविण्यात आली होती. सदरचे वाहन व त्यामधील तंबाखूजन्य गुटखा पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी संशयित आरोपी समीर बाबासो मुलाणी वय 33 रा लाहोटीनगर, मलकापूर, कराड यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाई करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल , कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी अभिनंदन केले आहे.