‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगाशी झुंज देत निधन; 38 व्या वर्षी कलाविश्वाला मोठा धक्का

मुंबई, दि.३१ | चांगभलं वृत्तसेवा
मराठी व हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत रविवारी पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला. ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकांमधील भूमिकांमुळे प्रिया घराघरात पोहोचली होती. तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रिया लाइमलाइटपासून दूर होती. सोशल मीडियावरही तिची अनुपस्थिती चाहत्यांना जाणवत होती. मात्र तिच्या तब्येतीबाबत कुणालाच ठोस माहिती नव्हती. अचानक आलेल्या निधनाच्या वृत्तामुळे मराठी आणि हिंदी मालिकांच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
रिपोर्टनुसार, आज दुपारी मीरारोड येथील हिंदू स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अभिनय प्रवास….
प्रियाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘या सुखांनो या’ या मालिकेतून केली. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा अनेक मालिकांमधून तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या. विशेषतः ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील वर्षा ही भूमिका प्रचंड गाजली.
मराठी मालिकांमधील नायिका तसेच नकारात्मक भूमिकाही ती तितक्याच ताकदीने साकारत असे. त्यामुळे तिने साकारलेल्या प्रत्येक पात्रातून प्रेक्षकांची मने जिंकली.
‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका करत असताना तिच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या होत्या. त्यामुळे तिने एका व्हिडीओ संदेशाद्वारे चाहत्यांना मालिकेला निरोप द्यावा लागल्याचं सांगितलं होतं. “आरोग्य आणि शूटिंग यामध्ये समतोल राखणं कठीण जातंय, म्हणून मला मालिकेतून बाहेर पडावं लागतंय”, असं ती म्हणाली होती.
वैयक्तिक आयुष्य…
2012 साली प्रियाने अभिनेता शंतनू मोघे याच्याशी विवाह केला होता. छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली ही लोकप्रिय अभिनेत्री अचानकच आपल्यात नसल्याची बातमी कलाविश्वाला मोठी पोकळी देऊन गेली आहे.