अजित पवारांच्या राजीनाम्याचा विषय पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा काढला!
चांगभलं ऑनलाइन | कराड
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या रोखठोक मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्या राजीनाम्याचा विषय पुन्हा काढत शरद पवारांकडे बोट दाखवले. ‘शरद पवार यांनी केलेल्या चुकांची फळं त्यांना भोगावी लागत आहेत’, असंही त्यांनी परखड मत मांडलं. ही मुलाखत आमदार चव्हाण यांनी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तवाहिनीला दिली आहे.
सुरुवातीला राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्रातील तत्कालीन घडामोडीनंतर अचानक थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल धडाडीने पूर्ण केला. अनेक धाडसी निर्णय घेतले. काँग्रेस मधील अनेक तरुण चेहऱ्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. मात्र सरकारची मुदत संपण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात असलेली ही सल त्यांनी अनेकदा यापूर्वी ही बोलून दाखवली आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र टाईम्स या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा विषय पुन्हा काढत थेट शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले.
याबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही त्यांनी असं अनेकदा केलं. मात्र प्रत्येक वेळी शरद पवार यांनी त्यांना आणखी मोठी पदं दिली, त्यांनी केलेल्या या चुकांची फळं त्यांना आता भोगावी लागत आहेत.
दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीन पक्षांची आघाडी असल्यामुळे जागा वाटपात काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्याचं सांगितलं. ‘आम्ही सांगली आणि मुंबईमध्ये तडजोडी केल्या, पण एकंदरीत फार मोठा वाद नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र प्रचार एक दिलाने केल्याचे सांगून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडण्यात आल्याने त्यांना सहानुभूती मिळत असल्याचं’ त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत मतदारांमध्ये नकारात्मकता असल्याचं सांगून सुरुवातीला आपण 24 ते 25 जागा महाविकास आघाडीकडे येतील असे सांगत होतो, मात्र आता हा आकडा वाढणार असल्याचं समोर येतंय, त्यामुळे महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येतील. तर देशात भाजप 220 ते 250 या दरम्यान असेल. आणि एनडीएला 272 चा आकडाही गाठता येणार नाही. त्यामुळे 400 पार सोडा 303 पेक्षा एक तरी जादा सीट मिळावी यासाठी मोदींचा प्रयत्न सुरू आहे, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण सांगितले.