हायवेच्या नियोजनशून्य कामावर पृथ्वीराज बाबा भडकले
हायवेवरील ट्राफिक समस्या गांभीर्याने घेण्याबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील कामामुळे आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून दुरवर ट्राफिक झाले होते. याबाबत कराडचे पत्रकार अस्लम मुल्ला यांनी ट्राफिक समस्येची बातमी केली होती तसेच दक्ष कराडकर या सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन हायवेवरील कामामुळे निर्माण झालेली ट्राफिक समस्येबाबत माहिती दिली. त्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ट्राफिक परिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी करून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कराड शासकीय विश्रामगृह येथे हायवेच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन तिथूनच NHAI (एन एच ए आय) चे प्रोजेक्ट प्रमुख पंधरकर यांना दूरध्वनीद्वारे कराड येथील हायवे च्या कामाची परिस्थिती सांगून झालेल्या पावसाने महामार्गांवर पाणी साठल्याने कशा प्रकारे ट्राफिक समस्या उद्भवते याची माहिती देऊन हायवेच्या नियोजनशून्य कामावर संताप व्यक्त केला.
हायवेच्या नियोजनशून्य कामामुळे सामान्य नागरिकांना पहिल्या पावसातच समस्येला सामोरे जावे लागले यामध्ये सुधारणा करून तात्काळ आटके टप्पा व पाचवड फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावर साठलेले पाणी जाण्यासाठी ड्रेनेज मार्ग करावा आणि इथून पुढील काम नियोजन पद्धतीने करावे अशा सक्त सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
आ. चव्हाण यांच्या सूचनेनंतर हायवेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जिथे पाणी साठले आहे त्या ठिकाणी जेसीबी च्या साहाय्याने पाणी जाण्यासारखा मार्ग केला व त्यानंतर काही वेळातच ट्राफिक पूर्ववत झाले.
हायवेचे काम सुरु झालेपासून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला प्रत्येक 15 दिवसांनी तर त्यानंतर वेळोवेळी हायवेच्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत मिटिंग घेऊन कामाचे नियोजन बघितले आहे. कराड व मलकापूर येथील उड्डाणं पुलाच्या कामावेळी तर आ. चव्हाण यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून कामही वेळेत व्हावे आणि ट्राफिक समस्या सुद्धा होऊ नये याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आता उड्डाणं पुलाचे काम निम्याहून अधिक पूर्ण झाले असून आता कोल्हापूर कडे जाणाऱ्या हायवे विस्ताराचे काम सुरु आहे याठिकाणी निर्माण झालेल्या समस्येबाबत पुन्हा एकदा मिटिंग घेऊन सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या आहेत.