पृथ्वीराजबाबांनी कराडची ओळख विकासात्मक कार्यातून पुढे नेली – माजी मंत्री सत्तेज उर्फ बंटी पाटील
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी कराडमधील विठ्ठल चौक, आंबेडकर चौकात सभा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पृथ्वीराजबाबांना कराड दक्षिणचे जनतेने सहकार्य करावे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात काम करतो. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, पी. डी. पाटील यांनी कराडला पुढे नेले आहे. पृथ्वीराजबाबांनी सुद्धा कराडची ओळख विकासात्मक कार्यातून पुढे नेली. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामांची यादी वाचायची तर ती खूप मोठी होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
कराडमधील विठ्ठल चौक व आंबेडकर चौकात झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी प्रकाश नहाटा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खा. चंद्रकांत हंडोरे, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, शशिराज करपे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, विठ्ठल शिखरे, अमित जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, बाळूताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हं नेतृत्व आहे. या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा दबदबा दिल्लीपर्यंत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी रहा.
ते म्हणाले, कोविड काळानंतर काँग्रेस व महाआघाडीचे सरकार स्थिर होऊ पाहत होते, नेमके त्याच वेळी एकनाथ शिंदे पळून गेले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. पृथ्वीराजबाबा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचे कोणतेही काम डावलले नव्हते. मात्र याचा उलट अनुभव आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून आला. एकनाथ शिंदे यांच्याकडे मलकापूर नगरपरिषदेच्या इमारतीसाठी किमान पाचवेळा मनोहर शिंदे यांना घेवून मी स्वतः गेलो. मात्र त्यांनी हे काम केले नाही. आमचे काम करताना एकनाथ शिंदे यांचा हात जड होत होता, असा वाईट अनुभव आम्हाला आहे.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, जातीधर्मातील द्वेष पसरवण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यांचा डाव वेळीच ओळखा. खा. चंद्रकांत हंडोरे म्हणाले, बहुजन हिताय बहुजन सुखाय हाच विचार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आयुष्यभर जपला आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपच्या सरकारने शेतमालाचे भाव पाडले, महागाई वाढवली. त्यामुळेच लोकसभेत समाजातील सर्व घटकांनी भाजपच्या नेत्यांना दणदणीत पराभव दाखवला आणि कॉंग्रेस आघाडीला ६५ टक्के पसंती दिली. त्याचीच पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये, शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्जमाफी व सुशिक्षित तरुणांना महिन्याला भत्ता देण्याचे अभिवचन आम्ही निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. हे सर्व देताना कुठेही सरकारी तिजोरीवर भार न आणता दिले जाणार आहे, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.