कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानाला रवाना करण्यासाठी केंद्रनिहाय साहित्य तयार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासच उरले आहेत. प्रचार तोफा आज सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. आता सुरू झाली आहे, मिशन वोटिंगची घाई. त्यासाठी २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्यावतीने मतदानासाठी लागणारे साहित्य रवाना करण्यासाठी मतदान केंद्रनिहाय तयार ठेवण्यात आले आहे.
स्ट्रॉंगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट मशीन्स उद्या सकाळी बाहेर काढल्या जातील. त्यासोबत या पिशव्या घ्यायच्या, त्यातील साहित्य इथेच तपासायचे आणि आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर निघायचे. असे मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियोजन तयार झाले असून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र. नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्या सहकार्याने निर्वीघ्नपणे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी केंद्राध्यक्ष व त्यांच्या टीमला तिसरे प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज बैठक व्यवस्था व साहित्य देण्या-घेण्यासाठी क्रमांकानुसार टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत.
(सर्व फोटो : दिलीप माने, मसूर)