प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर ; दहिवडीत झाला सन्मान
चांगभलं ऑनलाइन | दहिवडी
प्रवीण काकडे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी दहिवडी ता. माण येथे बोलताना केले.
धनगर समाज व विविध संस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रवीण काकडे यांचा सत्कार कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. उत्तमराव वाघमोडे होते. कुलगुरू महानवर पुढे म्हणाले, प्रवीण काकडे यांनी आपली नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीचे दिवशी व वेळ मिळेल तसे सामाजिक व शैक्षणिक चळवळीला बळ दिले आहे. डोंगर दऱ्या-खोऱ्यातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात आणुन त्यांना सहकार्य केले. आजही लोक घराच्या बाहेर पडायला मागत नाहीत, आपली नोकरी व आपला कुटुंब एवढंच विश्व मानत आहेत, त्या बुद्धिजीवी वर्गाला प्रवीण काकडे यांनी आदर्श घालून दिला आहे.
बहुजन समाज शिक्षणापासून वंचित आहे. बहुजन समाज अंधारात आहे, त्याला प्रकाशाकडे नेण्याचं कामं खऱ्या अर्थाने प्रवीण काकडे करत आहेत. त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे. त्यांनी समाजात ग्राऊंड लेव्हलला जाऊन सामाजिक शैक्षणिक अंधश्रद्धा, बालविवाह, उद्योग या क्षेत्रात प्रबोधन करुन समाजासाठी चांगले काम केले आहे. कोरोना काळात डोंगर दऱ्या खोऱ्यातील मुलांना पायपीट करत १० किलोमीटर अंतरावर तर कधी २० किलोमीटर अंतरावर जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे आदर्श घालून दिला. कोरोना काळ अतिशय भयंकर काळ होता, त्यावेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, पुणे या सातही जिल्ह्यातील जंगलातील, डोंगरातील विद्यार्थांपर्यंत पोहचुन शैक्षणिक साहित्य वाटप केले. हे शैक्षणिक चळवळीला बळ आहे तरी त्यांचा आदर्श घेऊन समाज बांधव यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
याप्रसगी डीवायसपी अश्विनी शेंडगे, अर्जुन काळे, उत्तमराव वाघमोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सौरभ दडस यांची भाषणे झाली. दादासाहेब चोपडे, आण्णासाहेब कारंडे, बिरा लोखंडे, उपप्राचार्य डॉ. अनिल दडस, वसंतराव सजगणे, दिपक शिंदे, डॉ. किरण कारंडे, अमृत चौगुले, नितीन पुकळे, रमेश गोरड, धनंजय शिंगाडे, घनश्याम काळे, विठ्ठल दडस, बळीराम वीरकर, मोहन करे, आबासो दडस, दिलीप शिरकुळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. एम. डी. दडस यांनी केले व आभार श्रीकांत दोरगे यांनी मानले.