शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण सहभागमुळे प्रकाश पाटील यांचा सन्मान

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथील सहशिक्षक प्रकाश पाटील यांचा शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० दरम्यान सन्मान करण्यात आला.
शिक्षक क्षमता वृध्दी २.० प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) फलटण आणि पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण हे कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये पार पडले. या प्रशिक्षणात शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासावर भर देण्यात आला.
या प्रशिक्षणामध्ये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF), राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक क्षमता विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
विशेष म्हणजे प्रकाश पाटील यांनी SCERT पुणे तर्फे तयार करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखड्याच्या मार्गदर्शिका निर्मिती व भाषांतर कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण ( DIET) चे प्राचार्य डॉ. अमोल डोंबाळे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे वरिष्ठ अधिव्याख्याता विजय भिसे आणि कराड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, केंद्रप्रमुख गणेश जाधव, प्रवीणकुमार कारंडे, प्रशिक्षण समन्वयक शैला भिसे, तज्ञ मार्गदर्शक चंद्रकांत तडाके, मेघना भोसले, उज्ज्वला मोरे, अनिल कदम, नितीन राऊत, सविता कदम, योगिता संकपाळ, परिसरातील विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.