छायाचित्रकार दत्तात्रय भट, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांच्यासह पाच जणांना ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठोत्तम पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ नागरिकांना कृष्णा हॉस्पिटलतर्फे आदर्श सेवा देण्याचा प्रयत्न : डॉ. सुरेश भोसले
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने ज्येष्ठ नागरिक संघटनांची नोंदणी करून, त्यांना आदर्श सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून एकदा मोफत वैद्यकीय तपासणी करून, त्यांचे डिजीटल हेल्थ रेकार्ड तयार करण्याचा आमचा मानस आहे. कराडच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद असून, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
कराड येथील कृष्णाबाई मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संघाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठोत्तम पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा सौ. सविता देशपांडे, कार्यवाह श्रीकांत साने आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाचे जीवनमान कमी होत चालले आहे. यामुळे ५० ते ६० वयामध्येच प्रत्येकाने आपल्या आहाराची, व्यायामाची काळजी घेणे गरजेचे आहे. राहणीमान चांगले असेल तर आयुष्य वाढलेले दिसेल. ग्रामीण भागात आजही ९० ते १०० वयोतील महिला व पुरूष आढळून येतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सन्मानमूर्तींशी माझा परिचय झाला. त्यांचे कार्य गौरवास्पद असून, त्यांच्या सामाजिक कार्याला या सन्मानामुळे आणखी बळ मिळाले आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार दत्तात्रय भट, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट बाळकृष्ण जाधव, माजी सरपंच अनुपमा हरिदास, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते जयंत पालकर या विविध क्षेत्रातील सेवाभावी ज्येष्ठ नागरिकांना डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते ज्येष्ठोत्तम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ. सविता देशपांडे यांनी प्रास्तविक केले. एन. एन. शिंदे व एम. व्ही. कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पंडितराव देशपांडे, माधुरी कुलकर्णी, पी. डी. कुलकर्णी व रमेश महामुनी यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. दृष्यंत देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यांसह शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.