जनउत्सवाचे मानकरी!
नदी जशी उगमापाशी खूप लहान असते. जसजशी ती पुढे वाहत जाते तस तसे तिचे पात्र विस्तारत जाते. अगदी तशीच वाटचाल रामकृष्ण वेताळ यांची राहिली आहे. लोकनेते, जनसामान्यांचे आधारवड, दीनदुबळ्यांचे कैवारी अशी कितीतरी विशेषणं कमी पडतील असे खऱ्याखुऱ्या जनउत्सवाचे मानकरी म्हणजे मा. रामकृष्ण वेताळ (साहेब) होत. आज १० जानेवारी, मा. रामकृष्ण वेताळ (साहेब) यांचा वाढदिवस, हा वाढदिवस “ जनउत्सव ” म्हणून कराड उत्तर मध्ये सर्वत्र साजरा होत आहे. त्यानिमित्त…
अकेला चला था,
लोक जुडते चले गये,
और काॅंरवा बनता गया..!
असंच रामकृष्ण वेताळ (साहेब) यांच्याबाबत म्हणावं लागतं. त्याचं कारणही तसंच आहे. सुर्ली ता. कराड सारख्या लहानशा गावात जन्म घेऊन संपूर्ण आपल्या कार्यकर्तुत्वाने कराड उत्तरला आपल्या कवेमध्ये घेण्याची किमया या नेतृत्वाने लिलया साकारली आहे.
सारं हे त्यांना कसं शक्य होतं तर त्यांच्याकडील अफाट लोकसंग्रहामुळं! कराड उत्तर मधील गावागावातील युवकांचा मोठा वर्ग त्यांचा चाहता आहे. या तरूणांच्यामध्ये वेगळी जिद्द आणि उमेद आहे. काही नवं करण्याचा ध्यास आहे. या प्रेरणेच्यामागे साहेबांच्या विचारांचे भक्कम अधिष्ठान आहे. त्यांच्या वाढदिवशी सुर्ली येथे उसळणारा जनसागर हीच त्यांच्या लोकसंग्रहाची आणि त्यांच्यावरील जनतेच्या प्रेमाची पोहोचपावती आहे.
लोकसंग्रहाची ही आवड संस्कार आणि जीवनमूल्ये यांची देण असते. त्यासाठी नेत्यांमध्ये पहिला गुण आवश्यक असतो तो म्हणजे लोकांच्या इच्छा, समस्या समजून घेणे. हा गुण रामकृष्ण वेताळ यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यांच्या सभोवती जमणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा काय आहे किंवा त्याची अडचण काय आहे, हे अत्यंत चाणाक्षपणे ते समजून घेतात आणि ही अडचण सोडवण्यासाठी तत्पर राहतात. त्यामुळेच त्यांचे लोकसंघटन दिवसेंदिवस विस्तारत आहे.
संवाद आणि संवेदना जपणारा नेता राजकारणात यशस्वी होतोच, किंबहुना यशस्वी नेतृत्वाकडे ते महत्त्वाचे पैलू असतात. वेताळ साहेब यांच्याही बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. राजकीय नेत्यांच्या भोवती बडव्यांचे कोंडाळे असते. त्यामुळे भेट दूरापास्त असते. मात्र रामकृष्ण वेताळ यांना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही. त्यांची थेट आणि ग्रेट भेट होते, असा अनुभव हजारोंना आहे. कार्यकर्ते निःसंकोचपणे आपले मन मोकळे करतात, जनतेला तर हा नेता आपली समस्या ऐकून घेतोय आणि ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय ही भावना बळ देवून जाते. त्यामुळेच रामकृष्ण वेताळ साहेब यांचा जनाधार वाढत आहे.
नीतिमान नेतृत्व हा गुण त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. आज समाजामध्ये सर्वत्र स्वार्थ आणि फसवेगिरी यांची बजबजपुरी निर्माण झाली असताना वेताळ साहेबांसारखा नीतिमान नेता अनेकांच्या नजरेत भरतो. शब्द दिला की तो पाळणारच, असा त्यांचा स्वभाव लोकांच्या मनात आपुलकी अन् विश्वास निर्माण करतो. गेली २३ वर्षे ते लोकसंग्रह करण्यासाठी झटत आहेत. २३ वर्षे त्यांच्या खांद्यावर एकाच पक्षाचा झेंडा आहे मग भलेही सत्ता असो अथवा नसो. आपला पक्ष वाढवत राहणे हे काम त्यांनी अखंडित सुरू ठेवले आहे. अशी पक्षनिष्ठा त्यांना राजकीय क्षेत्रात लोकसंग्रह वाढीसाठी कारणीभूत ठरली आहे.
कराड उत्तर मतदारसंघांमधील गावागावात त्यांना मानणारा मोठा गट तयार झाला आहे. प्रामाणिकपणे लोकांची कामे करणे लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडणे, या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि समस्या सोडवून लोकांच्या अडचणी दूर करणे हा त्यांच्या कामाचा आणि यशाचा मार्ग आहे.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांना आदर्श मानून लोकसेवेचे व्रत ते अखंड राबवत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने अनेक कामे मार्गी लावणे त्यांना सहज शक्य बनत आहे.
सातारा जिल्हा उपाध्यक्ष, बाजार समिती तज्ञ संचालक, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक, अशा चढत्या क्रमाने काम करीत असताना नेहमीच त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी लीलया पार पाडण्यासाठी ते २४ बाय ७ काम करीत असतात. त्यामुळे केंद्राच्या पी.एम. किसान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, श्रावण बाळ योजना, हर घर तिरंगा मोहीम, मेरी माटी मेरा देश मोहीम, ही पूर्ण क्षमतेने त्यांनी कराड उत्तर मतदारसंघांमध्ये राबवली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या योजना , विकासाची कामे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. रस्ते, वीज, पाणी या योजनांसाठी अनेक गावांना त्यांनी शासनाकडून निधी मिळवून दिला आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून अनेकांना प्रयत्नपूर्वक त्यांनी मदत मिळवून दिलेली आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम कराड उत्तर मध्ये अनेक जण बोलून दाखवतात. गरीब पैलवानांना दत्तक घेउन त्यांनी केलेली मदत अनेक कुस्ती मैदानामध्ये ऐकवली जात असते. पक्षाने दिलेला कोणताही उपक्रम हा पक्षादेश मानून पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने ते अखंड काम करीत असतात. यामुळेच अतिशय सशक्त अशा बूथ कमिट्या, शक्ती केंद्र आणि वॉरियर्स यांची रचना त्यांनी निर्माण केलेली आहे. सर्वांशी अखंडितपणे त्यांचा संवाद सुरू असतो. या सर्वांशी संवाद सुरू राहिल्याने आणि समस्यांची अखंड सोडवणूक होत राहिल्याने दररोज पक्षाशी आणि त्यांच्याशी जोडल्या जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
लोकसंग्रहक नेता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. वडील श्रीमंतराव आणि आई इंदूमती यांनी माणसं जोडण्याची कला त्यांना शिकवली. हीच कला आज त्यांना अनेकांना आपलेसे करून घेण्यासाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळेच ते कुशल लोकसंग्राहक आणि जन उत्सवाचे मानकरी ठरतात. ही ओळखच त्यांना कराड उत्तरच्या क्षितिजावरील चमकता तारा बनवून जाणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
“पंखातील बळावर घेतो मी गरुड भरारी,
जनहिताची प्रेरणा हीच अंतरीची माझी उभारी.”
– शब्दांकन के. संदीपजी.
(साहेब प्रेमी)
आजची कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी 9:00 वाजता – सुर्ली येथे भव्य रक्तदान शिबिर उद्घाटन
सकाळी 9:30 वा. – सुर्ली येथे सु साईनाथ गोपालन संस्था येथे गाईंना चारा वाटप.
सकाळी 10:00 वा.- नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आदरांजली.
सकाळी 10:30 वा.- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड कार्यालयाला सदिच्छा भेट.
सकाळी 11:30 वा. -उंब्रज येथील जागृती आश्रमशाळा येथील विदयार्थ्यांना स्नेहभोजन
दुपारी 12:30 वा.– पाल ता. कराड येथील श्री खंडोबा दर्शन घेऊन पाल येथील योगेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण समारंभ.
दुपारी 1:15 वा.– वळसे ता.जि. सातारा येथील एहसास मतिमंद शाळा येथे फळ वाटप.
दुपारी 2:30 वा.– नागझरी ता. कोरेगाव येथील संत रोहिदास आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन समारंभ
दुपारी 3 वा.– सुर्ली ता. कराड येथील निवासस्थानी स्नेहभोजन व शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार