यंदा ऊसाला एफआरपी अधिक ५०० रूपये जाहीर करा
अन्यथा आंदोलन करू : सचिन नलवडेंचा इशारा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गतवर्षी तुटून गेलेल्या उसाचे ५०० रूपये साखर कारखाने शेतकऱ्यांचे देणे लागत आहेत, त्याची पूर्तता लवकरात लवकर साखर कारखान्यांनी करावी. तसेच यंदा एफआरपी व अधिकचे ५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे. याबाबत नायब तहसीलदार राठोड यांना रयत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
नलवडे म्हणाले, मागील वर्षीपासून साखरेचे भाव प्रति क्विंटल ३५०० ते ४००० रुपये एवढे होते व आता ही ३८०० च्या आसपास आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे साखरेपासून मिळणारे उतपन्न वाढले आहे. तसेच मळी, बगॅस, मॉलेसेस इत्यादी प्राथमिक उप पदार्थ पासून मिळणारे उतपन्न ही चांगले आहे. प्राथमिक उप पदार्थ सोडून साखर कारखान्यांनी इथेनॉल, डिसलरी, को-जन सारखे उप पदार्थ निर्माण करुण चांगले उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळेच मागील वर्षिची एफआरपी देवूनही साखर कारखाने शेतकऱ्यांना आणखी ५०० रुपये देवू शकतात, कारण पुणे जिल्ह्यातील माळेगांव व सोमेश्वर साखर कारखान्यांनी साखर उतारा ११.९० असताना एफआरपी पेक्षा ४६० ते ३०० रुपये जास्त दिले आहेत. आपल्या भागातील साखर कारखान्यांचा साखर उतारा १२ च्या पुढे १२.६० पर्यंत असल्याने मागील वर्षिचे ५०० रुपये देणे शक्य होणार आहे. ते साखर कारखान्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत.
तसेच ऊस नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी कारखाने सुरु करण्यापूर्वी यावार्षिची आपली पहिली उचल जाहीर करणे बंधन कारक आहे. परंतु अद्यापही कारखान्यांनी आपली उचल जाहीर केलेली नाही. त्यामुळे साखर आयुक्त यांनी अशा साखर कारखान्यांवर कारवाई करावी. यंदा साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक ५०० रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे नायब तहसीलदार राठोड़ यांच्याकडे केली असल्याचे नलवडे यांनी सांगितले.
यावेळी रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जेष्ठ शेतकरी नेते सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव, रयतचे तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके आदी उपस्थित होते.
गावोगावी बैठक घेऊन ऊस परिषद घेणार…
“साखरेचे वाढलेले भाव पाहता कारखान्यांना उसाला एफआरपी पेक्षा अधिक भाव देता येतो. याबाबत गावोगावी बैठका घेवून लवकरच ऊस परिषद घेणार आहे. येत्या आठ दिवसात साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक ५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेवून रयत क्रांती संघटना सर्व कारखान्यावर तीव्र आंदोलन करणार आहे.”
– सचिन नलवडे,
सदस्य, ऊस नियंत्रण मंडळ,
महाराष्ट्र शासन.