साताऱ्याच्या आखाड्यात पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवण्यासाठी पवारांची खेळी…?

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्रात सातारा लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही अद्याप उमेदवार निश्चिती झालेली नाही. महायुतीचे संभाव्य उमेदवार लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी साताऱ्यात बैठक घेऊन चाचपणी केली होती. महाविकास आघाडीत सातारा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. मात्र साताऱ्याच्या बैठकीत स्वतः शरदचंद्र पवार यांचे नाव पुढे आले होते. मात्र त्यांनी याबाबत खुलासा करत आपण उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर श्रीनिवास पाटील यांच्यासह शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर अशी काही नावे कार्यकर्त्यांच्याकडून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र प्रकृतीचे कारण सांगून श्रीनिवास पाटील यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे साताऱ्यात उमेदवारी कोण करणार हा प्रश्न कायम असताना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनाच सातारा लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्यासाठी शरद पवार यांनी खेळी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.
सातारा लोकसभेचा बालेकिल्ला आबादीत ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनाच आखाड्यात उतरवण्याची तयारी सुरू केली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आज (रविवारी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथे भेट घेतली. यावेळी दोघात सुमारे तासभर कमराबंद चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अधिकृत जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र सातारा लोकसभा उमेदवारीच्या अनुषंगाने ही चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीच्या उमेदवाराला शह देण्यासाठी तेवढाच तोलामोलाचा उमेदवार महाविकास आघाडीकडे असणे गरजेचे आहे. राजकारणातील स्वच्छ चारित्र्याचा निष्कलंक नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यभरात ओळखले जाते. काँग्रेसमधील या वजनदार नेत्याने मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये कराड पाटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला आहे. त्यांना देश पातळीवरील राजकारणाची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीचा पुर्वानुभव आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनाच सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले तर महाविकास आघाडीला निवडणूक सोपी होऊ शकते. हे ओळखून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही नवी खेळी सुरू केली असल्याची चर्चा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.