राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचा घणाघात
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
अनेक निवडणुकांमधील सततच्या पराभवांनंतर लोकसभा निवडणुकीत दिसलेला आशेचा एक किरण कॉंग्रेसमधील सरंजामशाहीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. गांधी घराण्यातील नेता पूजनाची परंपरा पटोले पूजनापर्यंत पोहोचल्याचे आता पहावयास मिळत आहे. पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असून याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. धैर्यशील कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कदम यांनी पत्रकात म्हटले आहे, की देशाच्या राजकारणात कॉंग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले. याच परंपरेचा शिरकाव कॉंग्रेसमध्ये तळागाळात पोहोचला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. अनेक निवडणुकांत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या पटोले यांच्या अशा सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही.
पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेस बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित्त म्हणून पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी सुरू करावी व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही पत्रकात दिला आहे.