शंभूराज देसाईंना टक्कर देणाऱ्या पाटणकरांची भाजप राज्य कार्यकारणीत वर्णी | पाटणमध्ये नव्या राजकीय डावाची सुरुवात – changbhalanews
राजकिय

शंभूराज देसाईंना टक्कर देणाऱ्या पाटणकरांची भाजप राज्य कार्यकारणीत वर्णी | पाटणमध्ये नव्या राजकीय डावाची सुरुवात

कराड, चांगभलं वृत्तसेवा | हैबत आडके

पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राजकीय नवसंघर्ष उभा करणाऱ्या सत्यजित विक्रमसिंह पाटणकर यांना भारतीय जनता पक्षाने मोठा सन्मान दिला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या राज्य परिषद कार्यकारणीमध्ये पाटणकर यांना २०२५ ते २०२८ या कार्यकालासाठी स्थान देण्यात आले आहे.
ही नियुक्ती म्हणजे केवळ एक जबाबदारी नसून, पाटणकर गटाला भाजपमध्ये दिलेले राजकीय मानाचे स्थान आहे, असे स्पष्ट होत आहे. या नियुक्तीमुळे पाटण तालुक्याच्या राजकीय नकाशावर पुन्हा नव्याने भाजपचा ठसा उमटण्याची शक्यता आहे.

🔹 पाटणकरांचा भाजप प्रवेश – रणनीती की संधी?

सत्यजित पाटणकर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत प्रबळ लढत दिली होती. जरी त्या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांनी पाटण तालुक्यातील जनतेमध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण केला.
निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करून संघटनात्मक बळ वाढवण्याचा पाठपुरावा पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला होता. अखेर पाटणकर यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईत जाऊन भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर पाटणमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

🔹 राज्य कार्यकारणीत थेट प्रवेश – भाजपचा संदेश स्पष्ट!

भारतीय जनता पक्षाने नव्याने प्रवेश केलेल्या नेत्याला थेट राज्य परिषद कार्यकारणीत स्थान देणे, हे अत्यंत मोलाचे राजकीय पाऊल मानले जात आहे. ४५४ सदस्य असलेल्या पक्षाच्या या कार्यकारणीमध्ये आमदार प्रसाद लाड, सुरेश हाळवणकर , सुजय विखे पाटील, प्रकाश आवाडे यांच्यासारखे प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्याबरोबरच सत्यजित पाटणकर यांचाही समावेश झाल्याने भाजपने सातारा जिल्ह्यातील विशेषतः पाटण तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे, हे स्पष्ट होते.

🔹 पाटण तालुक्यात बदलती समीकरणं

पाटण तालुक्यात पाटणकर घराण्याचा राजकीय प्रभाव दीर्घकाळ टिकून आहे. सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांचे मजबूत वर्चस्व आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजपने पाटणकर गटाला विश्वासात घेतले, तर तालुक्यातील आगामी राजकीय चित्र बदलू शकते.
सत्यजित पाटणकर यांची राज्य कार्यकारणीत वर्णी लागल्याने भाजपची तालुक्यातील मुळे अधिक खोलवर रुजणार आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close