कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 40 हजार 743 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क… जिल्ह्यात सर्वाधिक 76.32 टक्के झाले मतदान – changbhalanews
राजकिय

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 40 हजार 743 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क… जिल्ह्यात सर्वाधिक 76.32 टक्के झाले मतदान

सर्वात कमी कराड मधील बुथवर अवघे 44.81 टक्के तर सर्वाधिक रेठरे बुद्रुक मधील बुथवर 94.50 टक्के मतदान

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये ‘काटे की टक्कर’ आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. कराड दक्षिण मधील एकूण 3 लाख 15 हजार 420 मतदारांमधील 2 लाख 40 हजार 743 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यात कोरेगाव विधानसभा मतदार संघा (77.64 टक्के कोरेगाव) नंतरचे सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे तब्बल 76.37 टक्के मतदान कराड दक्षिण मध्ये झाले आहे. दोन मातब्बर उमेदवारांसह अपक्षांचे भवितव्य सध्या मतदान यंत्रात बंद आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मात्र निवडणुकीचा कल काय असू शकतो, कोण विजयी होऊ शकतो, याच्या चर्चा मतदार संघात राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चांगल्याच रंगल्या आहेत. प्रत्येक जण बेरीज-वजाबाकी करत आपला उमेदवार विजयी कसा होऊ शकतो याचे आराखडे बांधताना दिसत आहेत.

कराड दक्षिण मधील मतदारांनी या निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदानाला प्रतिसाद दिला आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसापासून कराड दक्षिणचे निवडणूक अधिकारी आणि तिच्या मार्गदर्शनाखालील स्वीप पथक प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे. कराड दक्षिण मधील राजकीय संघर्ष प्रचारादरम्यान टोकाला गेला होता. मतदानाच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार झालेल्या मतदानामध्ये 1 लाख 23 हजार 896 पुरुष मतदारांनी (77.43 टक्के) मतदान केले आहे. तर 1 लाख 16 हजार 835 महिला मतदारांनी (75.19 टक्के) मतदान केले आहे. इतर मतदारांमधील 32 पैकी 12 मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या एकूण 3 लाख 15 हजार 420 मतदारांपैकी 2 लाख 40 हजार 743 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदार संघात 76.32 टक्के इतके मतदान झाले आहे.

सर्वात कमी कराड शहरातील बुथवर तर रेठरे बुद्रुक मधील बुथवर सर्वाधिक मतदान….

कराड दक्षिण मतदार संघातील निवडणुकीत शहरी भागातील कराड मधील 130 क्रमांकाच्या बूथवर 819 मतदारांमधील अवघ्या 367 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या बूथवर मतदार संघातील सर्वात कमी अवघे 44.81 टक्के इतकेच मतदान झाले. तर मतदार संघात रेठरे बुद्रुक गावातील बुथ क्रमांक 491 वर 946 मतदारांपैकी तब्बल 894 मतदारांनी मतदान केले, त्यामुळे या बूथवर मतदार संघातील सर्वाधिक 94.50 टक्के इतके मतदान झाले आहे.

मतदार संघाच्या एकूण मतदानाचा टक्का खूपच वाढला असल्याने वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जात असून कोण विजयी होईल आणि कोणाचा पराभव होईल याच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. मात्र यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी 23 नोव्हेंबरची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.

मुंबई-पुण्याचे मतदार परतू लागले… गाड्या हाउसफुल…

कराड दक्षिण मतदार संघात मतदान करण्यासाठी मुंबई, पुणे व अन्य ठिकाणावरून कामानिमित्त बाहेर असलेले हजारो मतदार मतदानासाठी आले होते. काल मतदान झाल्यानंतर आज अनेकजण पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी कुटुंबकबिल्यासह परतू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या तुडूंब गर्दीमुळे हाउसफुल होत आहेत.

चांगभलं न्यूजच्या वाचकांसाठी खाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बूथनिहाय झालेल्या मतदानाची फायनल आकडेवारी देत आहोत…

नियमित वाचा www.changbhalanews.com

ताज्या बातम्यांसाठी आपल्या ‘Changbhala News ‘ या YouTube channel ला सबस्क्राईब करा.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close