कृष्णा विश्व विद्यापीठात ‘न्यूरोकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन – changbhalanews
शैक्षणिक

कृष्णा विश्व विद्यापीठात ‘न्यूरोकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जगभरातील १५० न्युरोसायन्स तज्ज्ञांचा सहभाग; शुक्रवारी होणार उद्‌घाटन

चांगभलं | कराड प्रतिनिधी – हैबत आडके

येथील कृष्णा विश्व विद्यापीठात १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान न्यूरोसर्जरी विषयावरील ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातील १५० हून अधिक मेंदू विकारतज्ज्ञ, तसेच न्युरोसर्जन तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. शुक्रवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता या परिषदेचे उद्‌घाटन वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोसर्जिकल सोसायटीज्‌चे अध्यक्ष डॉ. लुईस बोर्बा यांच्या हस्ते व कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

जागतिक पातळीवर न्यूरोसर्जरी क्षेत्रात आमूलाग बदल होत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुंतागुंतीची असलेली न्युरोसर्जरी प्रक्रिया अधिकाधिक सुलभ बनत चाललेली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या जागतिक पातळीवरील वापराबाबत सर्वंकष चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने, कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठात १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेसचे संचालक डॉ. आईप चेरियन यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या परिषदेत, जगभरातील १५० हून अधिक न्युरोसर्जन तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे.

‘भविष्यातील न्यूरोसर्जरी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. याप्रसंगी कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, मुंबईतील लिलावती हॉस्पिटलचे न्युरोसर्जन डॉ. अतुल गोयल, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेसचे संचालक डॉ. आईप चेरियन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगप्रसिद्ध प्राध्यापकांची व्याख्याने, प्रत्यक्ष ऑपरेटिव्ह प्रात्यक्षिके, न्यूरोसर्जरी तज्ज्ञांसमवेत चर्चा आणि प्रदर्शन अशा विविध सत्रांचा समावेश असणार आहे. १८ ऑगस्ट रोजी या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप होणार आहे. दरम्यान, मेंदूविकारांवरील जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केलेले स्वतंत्र न्युरोसायन्स युनिट कृष्णा विश्व विद्यापीठात साकारण्यात आले आहे. याठिकाणी मेंदूविकारावरील सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचारांची सोय रुग्णांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

कृष्णा विश्व विद्यापीठात या परिषदेच्या अनुषंगाने १९ ऑगस्ट रोजी ‘न्यूरोसर्जरीमधील नवकल्पना आणि नवतंत्रज्ञान’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत न्यूरोसर्जरीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, न्यूरोसर्जरीमध्ये रोबोटिक्स आणि स्वायत्तता, मशीन लर्निंग, मायक्रोॲब्लेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि न्यूरोसर्जरीचे भविष्य अशा विषयांच्या अनुषंगाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे व न्युरोसर्जरी विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी अर्चना कौलगेकर यांनी दिली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close