चक्क एकाने रागा-रागात पेट्रोल ओतून ग्रामपंचायतीची घंटागाडीच पेटवली!
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शेताजवळील गटार साफ करत नाही तोपर्यंत इथे कचरा टाकायचा नाही, असे दमबाजी करत एकाने चक्क ग्रामपंचायतीची घंटागाडीचे पेट्रोल ओतून पेटवून दिली. सदैवाने गाडीवरील चालक बचावला. प्रसंगावधान दाखवून त्याने आग विझवली. मात्र आग लावणारा पळून गेला. या घटनेने संपूर्ण कराड तालुका हादरून गेला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सुरू असतानाच घडलेल्या या घटनेची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे, पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी,
20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी उंडाळे ग्रामपंचायतीची घंटागाडी कचरा गोळा करून कचरा डेपोत डंप करण्यासाठी गेली होती . सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी कचरा डंप करून परत येत असताना उंडाळे येथीलच अंकुश रामचंद्र मुळीक या संशयिताने घंटागाडी अडवून आमच्या शेताजवळील गटर्स का साफ करत नाही? गटर्स साफ केल्याशिवाय कचरा येथे टाकायचा नाही, असे म्हणत घंटागाडीच्या चालकाला दमदाटी चालू केली. त्यानंतर संशयित मुळीक याने चक्क पेट्रोल ओतून सदर घंटागाडी पेटवून दिली. सुदैवाने सदर घटनेत घंटागाडी वरील चालक बाळासाहेब कुंभार बालबाल बचावले. त्यांनी खाली उडी मारून सदर आग विझवली. मात्र घंटागाडीने पेट घेतल्यानंतर संशयित अंकुश मुळीक हा घटनास्थळावरून पळून गेला.
सदर घटनेची फिर्याद ग्रामपंचायत उंडाळेचे ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील व दादा पाटील यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शासकीय कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अंकुश मुळीक याच्यावर कडक कारवाई करावी व अशा गुंड प्रवृत्तीला वेळीच ठेचावे, अशी मागणी सरपंच संगीता माळी, बापूराव पाटील, उपसरपंच अजित कदम, दादा पाटील व ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. घटनेचा पुढील तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील माने करत आहेत.