नांदगावात शुक्रवारी महसूल विभागाचे एकदिवसीय शिबीर
पुरवठा विभाग, आधारविषयक सेवा, संजय गांधी शाखा यांचा होणार लाभ
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ‘महसूल पंधरवडा’ निमित्त ‘शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय कराड यांचे सहकार्यातून नांदगाव येथे शुक्रवारी दि.१६ आँगस्ट रोजी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुरवठा विभाग, आधारविषयक सेवा, संजय गांधी शाखा या विभागांच्या सेवा गरजूंना मिळणार आहेत. याचा लाभ काले व उंडाळे मंडलातील सर्व गावच्या लोकांनी घ्यावा असे आवाहन नांदगावचे ग्रामपंचायत सदस्य इंजि.प्रशांत सुकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,
परिसरातील लोकांची सोय व्हावी म्हणून मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृती मंच व कै. सौ. द्वारकाबाई तुकाराम सुकरे प्रतिष्ठान यांच्यावतीने हे शिबिर अयोजित केले आहे.
शिबिरात पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिकेमध्ये नाव वाढ करणे,शिधापत्रिकेतून नाव कमी करणे,फाटकी अथवा जीर्ण झालेली शिधापत्रिका बदलून देणे, गहाळ झालेली शिधापत्रिका बदलून देणे, शिधापत्रिका विभक्त करणे आदी कामे मार्गी लागणार आहेत.
आधार विषयक सेवांमध्ये
लहान मुलांची नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्ड अपडेट करणे, आधार कार्ड वरील नावात बदल करणे, आधार कार्ड वरील पत्त्यात बदल करणे, आधार कार्ड ला मेलआयडी लिंक करणे या गोष्टी होणार आहेत.तर संजय गांधी शाखेंतर्गत श्रावण बाळ योजना, अपंग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना यांची सविस्तर माहिती व फॉर्म उपलब्ध होणार आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे शुक्रवार दि. १६ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हे शिबिर होत आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन सुकरे यांनी केले आहे.