चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गावठी पिस्टल बाळगणा-यास त्याच्याकडील दोन गावठी कट्ट्यासह कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. दादा पटेल उर्फ युसुफ दिलावर पटेल, वय- ४५ वर्षे, रा. वाघेरी ता. कराड असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन अवैध गावठी कट्टे, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्र शोधुन कारवाई करणेबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल यांनी कराड शहर पोलीसांना दिले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांनी अशा अवैध शस्त्रधारकांची माहीती काढुन कारवाई करणेच्या सुचना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे कराड शहरात पेट्रोलींग करीत असताना पो. उपनिरीक्षक डांगे यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, दादा पटेल रा. वाघेरी ता. कराड हा गावठी पिस्टल बाळगुन चोरटी विक्री करण्याचे इराद्याने करवडीफाटा येथे थांबला आहे.
त्यावरून उपनिरीक्षक राजू डांगे व त्यांच्या पथकाने गुरूवारी, दि. २३ रोजी रात्री ७ वा. चे सुमारास अचानक छापा टाकुन करवडी फाटा येथे गि-हाईकाच्या प्रतिक्षेत असलेल्या इसमांस तो पळुन जात असतानाच झडप उघालुन ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव दादा पटेल उर्फ युसुफ दिलावर पटेल, वय- ४५ वर्षे, रा. वाघेरी ता. कराड असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेल्या दोन गावठी बनावटीचे कट्टे (पिस्तूले) तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटार सायकल असा मुद्देमाल मिळुन आला. सुमारे दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत हवालदार शशिकांत काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित दादा उर्फ युसुफ पटेल यास अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राज पवार हे करीत आहेत.
कराडला ८ जणांना अटक, ६ शस्त्र जप्त
कराडला शहर पो. स्टे. चे गुन्हे प्रकटीककरण शाखेने जुलै २०२३ पासून गत चार महिन्याचे कालावधीमध्ये आत्तापर्यंत कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध शस्त्र बाळगणारांविरुध्द ६ कारवाया केलेल्या असुन ६ अवैध शस्त्र जप्त केली आहेत. त्यामध्ये ८ जणांना अटक करण्यात आले आहे.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले…
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे कराड व परिसरातील गल्लीदादांचे तसेच शस्त्रांचा धाक दाखवून गुंडगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही अवैध शस्त्रांच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवणार असलेचे वपोनि प्रदिप सुर्यवंशी व पो. उपनिरीक्षक राजु डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
कारवाई करणाऱ्या पथकात यांचा समावेश….
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड चार्ज पाटण विभाग पाटण विवेक लावंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे. या पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पो. अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.