लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने नविन ऊर्जा मिळाली! – डॉ. प्रकाश आमटे

कराड, दि. २२ | चांगभलं वृत्तसेवा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०५ वा जयंती सोहळ्याचे निमित्ताने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य(कराड) ने यशवंतराव स्मृती सदन येथे समाजप्रबोधन व सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा ॲड. संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते शाल,मानपत्र व सन्मान चिन्ह,रोख रक्कम व फुले पगडीने ‘ सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार२०२५’ ने सन्मानितकरण्यात आले.
तत्पूर्वी ‘मित्र गारव्या साखा’ फेम सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी प्रबोधानत्मक कवीता सादर करुन उपस्थितांची वाहव्वा मिळवली.
यावेळी समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, स्वागताध्यक्ष रामभाऊ दाभाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा.मच्छिंद्र सकटे, प्रा.डॉ.शरद गायकवाड, माजी नगरसेवक सौरभ पाटील, धनगर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, शिवानी मुंढेकर, प्रा.पै.अमोल साठे, गजानन सकट, जगन्नाथ चव्हाण, पै.अक्षय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक विषमतेच्या झळा सोसताना अण्णाभाऊंना शाळेच्या वर्गाबाहेर बसवले गेले. मात्र तरीही अत्यंत प्रतिकूलतेवर मात करुन शोषितांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडत अण्णाभाऊ साठे यांनी जगभर नाव कमावले अशा स्फूर्तीदीप असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने मानवतेची ध्वजा ऊंचावण्यासाठी नविन ऊर्जा मिळाल्याची भावना डॉ. प्रकाश आमटे या़ंनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. यावेळी आमटे पुढे म्हणाले परदु:ख जाणून त्यांच्या जीवनात मानवतेचा व न्याय-हक्काचा आनंद निर्माण करण्यापेक्षा कोणताही धर्म नाही. झाडेवेली, पशुपक्षी व दीनदुबळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा बाबा आमटे यांच्याकडून घेतली. भामरागडच्या त्रिवेणी संगमावर ‘लोकबिरादरी प्रकल्पा’ च्या माध्यमातून वननिवासी,आदिवासी, फासेपारधी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून माणुसकीचे नंदनवन फुलवताना संपूर्ण आयुष्य सफल होत असल्याचा आनंद आहे. प्रतिकूलतेवर मात करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, पिडीत व कष्टक-यांची वेदना आपल्या साहित्यातून मांडली. समाजाने अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा जागर अखंड ठेवण्याचे आवाहनही डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महनीय व कर्तृत्ववान व्यक्तींचाही यावेळी समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर, सामाजिक कार्यकर्ते जावेद नायकवडी, सेवाभावी डॉक्टर एम. बी पवार, दानशूर काँम्रेड सुनील भिसे, यशस्वी उद्योजिका वैशाली भोसले, क्रीडा प्रशिक्षक वसंतराव पाटील, पै.किरण साठे व कल्पक उद्योजक जगन्नाथ सोनावणे यांना समाज गौरव पुरस्काराने तर संवेदनशील कवी प्रकाश नाईक यांच्या ‘या शकलांना सांधुया’ या दिर्घ कवितेस प्रा़ हरी नरके स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक प्रमोद तोडकर यांनी तर, प्रा. दीपक तडाखे यांनी, सूत्रसंचालन केले हरिभाऊ बल्लाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश सातपुते, राहूल वायदंडे, दत्ता भिसे (फौजी), सूरज घोलप, भास्कर तडाखे, कृष्णा लोखंडे, संजय तडाखे,कृष्णा लोखंडे , अण्णा पाटसुपे ,संजय थोरात यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रामाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी पुष्पहार अर्पण केला. डॉ. मंदाकिनी आमटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. संभाजीराव मोहिते, कवी अंनत राऊत, सौरभ पाटील, प्रविण काकडे, शिवानी मुंढेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.