जागतिक महिला दिनानिमित्त कराड नगरपरिषदेमध्ये भव्य महिला मेळावा संपन्न
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च रोजी कराड नगरपरिषद, महिला व बालकल्याण विभाग, दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिजाई शहर संघ कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने खास कराड शहरातील महिलांसाठी आयोजित केलेला भव्य महिला मेळावा, विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर तसेच विविध गुण दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम खूप उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्या निमित्त मुख्याधिकारी गट अ (निवड श्रेणी) श्री. शंकर खंदारे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन कराड नगरपरिषदेच्या कर निर्धारण अधिकारी सुविधा पाटील, सौ. सपना शेवाळे, सौ. दिपाली साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. रेखा देशपांडे, कराड नगरपरिषदेचे नगर अभियंता श्री. ए.आर. पवार, लेखाधिकारी श्री. मयूर शर्मा, डॉ. सविता मोहिते, महिला पोलीस हसीना मुजावर, अंगणवाडी सुपरवायझर सौ. नलिनी पाटील, बँक अधिकारी (बँक ऑफ इंडिया) नेहा जयस्वाल, समुपदेशक सौ. सविता खवळे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या मेळाव्याला उपस्थित मान्यवरांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे हक्क व कायदेशीर अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, नागरी आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी, महिला स्वच्छतादूत, यशस्वी उद्योजिका सौ. श्वेताली पाटील, महिला पत्रकार सौ. प्रतिभा राजे, आदर्श शिक्षिका सौ. उषा थोरात, माता रमाई महिला बचत गट, प्रीतीसंगम वस्ती स्तर संघ तसेच जिजाई शहर संघ यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत स्वच्छतेबाबत तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीमध्ये सातत्य रहावे यासाठी रांगोळी स्पर्धा, पोस्टर / चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, गुलाबपुष्प तसेच प्रथम क्रमांकास ५०००, द्वितीय क्रमांकास ३०००, तृतीय क्रमांकास २००० व उत्तेजनार्थ क्रमांकास १००० प्रमाणे बक्षीस रक्कम देऊन त्यांचा गुणगौरव व अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक श्री. नितिन भोसले, श्री. इनामदार, श्री. महेश कुंभार यांचाही यावेळी प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा, या उद्देशाने कराड नगरपरिषद महिला बालकल्याण विभागाच्यावतीने कराड शहरातील ३६ अंगणवाडी केंद्रासाठी इलेक्ट्रिक वजन काटे, ग्रीन बोर्ड, उंची मापक, सतरंजी तसेच इतर सर्व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले . तसेच कराड शहरातील सर्व नगरपरिषद शाळांना ढोल, ताशा, झांज, दोरउडी, रिंग असे सर्व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पुढील वर्षात शहरातील सर्व अंगणवाडी व शाळा या डिजिटल व ISO मानांकित प्राप्त करण्याबाबत महिला व बालकल्याण विभाग व शिक्षण विभागाने आत्मविश्वास व्यक्त केला.
महिलांना आपलं बाईपण अनुभवता यावं, त्यांनाही एखादा दिवस स्वतःच्या मनाप्रमाणे जगता यावा, यासाठी विविध गुणदर्शन , सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फॅशन शो, डान्स, मनोरंजन स्पर्धा यामधील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेच्या परीक्षका सौ. प्रेरणा धुमाळ यांचाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक तथा समुपदेशक अधिकारी सौ. दिपाली दिवटे, प्रस्ताविक समुह संघटिका सौ. अंजना कुंभार यांनी सदर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार समुपदेशक श्री. प्रमोद जगदाळे, महिला व बालकल्याण अधिकारी श्री. गणेश जाधव यांनी मानले.