अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड तालुक्यातील ‘या’ तीन गावात झाले शैक्षणिक साहित्य वाटप
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अहिल्यादेवींच्या दातृत्वास आणि कर्तृत्वास इतिहासात तोड नाही, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीच्या निमित्ताने ओंड-ओंडोशी-भोसलेवाडी ता. कराड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ओंडोशी येथे विधवा महिला आक्काताई फसाले यांचे शुभहस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रवीण काकडे पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवण्याचे काम केले. जगातील पहिली न्यायव्यवस्था व न्यायालय ही अहिल्यादेवी यांनी स्थापन केली. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सर्वांना न्याय मिळवून दिला. अहिल्यादेवी होळकर यांची ज्ञानसंवर्धनाची दुरदृष्टी, संस्कृती, धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाची सांगड घालून समाजात बदल घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पती निधनानंतर सती न जाता होळकरांच्या महान साम्राज्याचे रक्षण करून ते वाढवण्याचे महान कार्य अहिल्यादेवी यांनी केले. अहिल्यादेवी धार्मिक होत्या परंतु धर्म भोळ्या नव्हत्या, श्रद्धाळू होत्या पण अंधश्रद्धाळू नव्हत्या.
अहिल्यादेवी यांनी देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला . महिला ही हिम्मतवान, कर्तुत्वान, बुद्धिमान, मुत्सद्दी, पराक्रमी, करारी शुर, उत्तम राज्यकर्ती असते हे अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला दाखवून दिले .एक विधवा महिला देखील इतिहास घडवू शकते हे जगाला दाखवून दिले, म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक ही पदवी देण्यात आली, असे ही काकडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सतिश थोरात कराड उत्तर अध्यक्ष. विलास पोळ कराड दक्षिण अध्यक्ष, शिवाजीराव पोळ, आनंदा पोळ, भगवान खांडेकर, बाळासाहेब चोरमले , विनोद फसाले, श्रीरग फसाले , सरपंच मारुती ढेबे , सौ. पुजा भोसले उपसरपंच व विद्यार्थी उपस्थित होते.