दिवाळीच्या तोंडावर कराड पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
175 कर्मचारी बेमुदत संपावर : थकलेले वेतन, बोनस देण्याची
कराड. | प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर कराड नगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल 175 सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. गेल्या तीन वर्षापासूनचा पीएफ भरावा, किमान वेतन देण्याचं आश्वासन पूर्ण करावं, थकलेलं दोन महिन्याचे वेतन, अधिक दिवाळी बोनस तातडीने मिळावा, अशी मागणी करत या कर्मचाऱ्यांनी बारा डबरे भागात आज घंटागाड्या एकत्र उभा करून काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.
नगरपालिकेचे घंटागाड्यावरील तसेच सफाई कर्मचारी आणि गटर स्वच्छता विभागातील असे तब्बल 175 कर्मचारी हे ठेकेदारांच्याकडे कंत्राटी म्हणून काम करतात. मात्र पालिकेच्या या स्वच्छता दूतांना गेल्या दोन महिन्यापासून अद्याप वेतन मिळालेले नाही. त्यांना गेल्या तीन वर्षापासून बोनस मिळालेला नाही. गेल्या तीन वर्षापासून त्यांचा पीएफ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. किमान वेतन देण्याचंही आश्वासन देण्यात आलं होतं मात्र ते पूर्ण करण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे विविध विभागातील पालिकेचे 175 सफाई कर्मचारी आज शनिवारपासून संपावर गेले आहेत.
आपल्या मागण्यासाठी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, दाद मागितली. मात्र ‘पालिकेचा आणि तुमचा काही संबंध नाही, तुम्ही ठेकेदारांच्या मार्फत कंत्राटी स्वरूपात नियुक्त आहात, त्यामुळे तुमचे पगार व इतर सर्व देणे हे ठेकेदार देणे लागत असल्याचे’ पालिकेतून त्यांना सांगण्यात आले आहे. अखेर दिवाळी जवळ आली असल्याने आणि पगार थकला असल्याने त्यांनी आज बारा डबरे परिसरात घंटागाड्या एकत्र उभा करून बेमुदत संप सुरू केला आहे.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका कराड शहरातील स्वच्छता विभागाला बसणारं आहे. काही दिवस स्वच्छता थांबली तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराबरोबर समन्वय व संपर्क साधून यामधून मार्ग काढावा अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.