आपली संस्कृती
वाईच्या न्यू गजानन मंडळाचा रामोशी समाजाकडून सन्मान
उमाजीराजे नाईक यांच्यावर केला होता सजीव देखावा
- सातारा प्रतिनिधी | हैबत आडके
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्यलढा उभा करणारे आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांच्या जीवन कार्यावर सजीव देखावा सादर करणे हे एक मोठ्या आव्हान असते. मात्र हे आव्हान पेलत दर्जेदार आणि दमदार देखावा सादर करून उमाजीराजे यांच्या शौर्याचा इतिहास ते खव्याच्या रूपात मांडणारे साताऱ्याच्या वाई शहरातील न्यू गजानन मंडळ राज्यभरात कौतुकाचा विषय ठरले होते. त्यामुळे या मंडळाचा वाई तालुका एकसंघ रामोशी समाज यांच्यावतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
ब्रिटिशांच्या विरोधात पहिला लढा उभा करणारे आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. भिवडी व पुणे येथील स्मारक स्थळावर मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होत असते. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्रीगण उपस्थित राहत असतात. या पार्श्वभूमीवर उमाजीराजे यांच्या जीवन कार्याचा अभ्यास नव्या पिढीकडून होऊ लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभारणीचे कार्य आणि उमाजीराजे नाईक यांचा ब्रिटिशांच्या विरोधातला स्वातंत्र्यलढा यामधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवराय हेच उमाजी राजे नाईक यांचा आदर्श होते. उमाजीराजे यांच्या जीवन चरित्रातील अशा अनेक पैलूंची मांडणी करत उत्तम सजीव देखावा सादर करणे हे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठेच आव्हान असते. मात्र हे आव्हान वाई शहरातील गंगापूरी येथील न्यू गजानन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्तमरीत्या पेलले आणि या मंडळाने सादर केलेल्या देखाव्याचे राज्यभरातून कौतुक झाले.
या मंडळाने साकारलेला उमाजी नाईक यांचा जीवनपट उलगडणारा जिवंत देखावा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
या माध्यमातून न्यू गजानन मंडळाने दर वर्षीप्रमाणे यंदाही शौर्याच्या एका तेजस्वी इतिहासाला गवसणी घातली. देखाव्यासाठी ऐतिहासिक सेट्सची निर्मिती करण्यात आली होती. उमाजीराजेंच्या जीवनावरील पुस्तके, इंटरनेटवरील माहिती संकलित करण्यात आली होती. त्यातून देखाव्याचे कथानक लिहून त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून आणि पार्श्वसंगीताची जोड देवून देखाव्याचा परिपूर्ण ऑडिओ बनविण्यात आला. त्यावर सराव करून मंडळातील कलाकारांनी अप्रतिम सजीव देखावा साकारला..
सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरचा देखावा सर्वदूर पोहोचला. त्यामुळे गणेशोत्सव काळात रामोशी समाजातील अनेक संघटना व ग्रुप हे सदरचा देखावा पाहण्यासाठी राज्यभरातून वाई येथे दाखल होत होते. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले. दरम्यान , मंगळवारी वाई तालुक्यातील एकसंघ रामोशी समाज यांच्यावतीने न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यास वाई शहरासह तालुक्यातील मेणवली, भोगाव, पांडेवाडी, अभेपुरी, बावधन, बेलमाची, उडतारे, सुरूर, पाचवड, शिरगाव ,ओझर्डे, परखंदी, बोपर्डी अशा अनेक गावातून रामोशी समाजातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.