ॲट्रॉसिटी कायद्याची जागृती वाढवण्याची गरज आहे – ऍड. प्रवीण पाटील
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अनुसूचित जाती, जमाती यांच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची निर्मिती केली असून ज्यांच्या वरती अन्याय झालेला आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. या कायद्याबाबत अनेक समज गैरसमज निर्माण झालेले आहेत, ते गैरसमज दूर करण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची जागृती वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ऍड प्रवीण पाटील यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ( बार्टी) पुणे यांच्यावतीने कराड उपविभागीय ॲट्रॉसिटी दक्षता आणि नियंत्रण समिती सदस्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याकरिता ॲट्रॉसिटी कायद्याबाबत विशेष कार्यशाळेत ऍड.पाटील बोलत होते. या कार्यशाळेस कराड उपविभागीय अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अतुल म्हेत्रे, समितीचे सचिव गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासिलदार, संविधान प्रचारक दीपाली कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऍड. पाटील यांनी ॲट्रॉसिटी कायद्याबाबतची कायदेशीर माहिती कलमे सविस्तर माहिती देऊन असा गुन्हा घडल्यानंतर पोलीस विभागाने कोणती दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच तपास यंत्रणा व या गुन्ह्याचा निकाल लवकर लागण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना व कामकाज याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
तर संविधान प्रचारक दिपाली कांबळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेवर आधारित या कायद्याचे महत्व व गरज विशद केली.
कराड उपविभागीय अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अतुल म्हेत्रे यांनीही या कायद्याबाबतचे कामकाज करताना महसूल विभाग व पोलीस विभाग यांची जबाबदारी काय आहे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस कराड उपविभागीय ॲट्रॉसिटी आणि दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य माजी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, विद्याधर गायकवाड, विकास मस्के, अंजली पाटील, राजमाने, सौ. साठे, नायब तहसीलदार राठोड आदी मान्यवरांसह महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्राम विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक नायब तहसीलदार विश्वजीत राजपूत यांनी केले. मान्यवरांचे स्वागत गटविकास अधिकारी आणि या समितीचे सचिव प्रताप पाटील यांनी केले. तर आभार अभियंता अजिंक्य पाटील यांनी मानले