कराड | प्रतिनिधी
पांढऱ्या रंगाच्या एम. एच. १० डी. एस. ८६६० क्रमांकाच्या अॅक्टिवा मोटरसायकलवरून गांजा वाहतूक करताना एकास पोलीस उपाधीक्षक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गाच्या सर्विस रोडवर कराड तालुक्यातील आटके टप्पा ते पाचवड फाटा यादरम्यान करण्यात आली.
पोलिसांनी संशयताला अटक केली असून त्याच्याकडील एक लाख वीस हजार रुपये किमतीचा गांजा व ५० हजार रुपयांची दुचाकी मिळून एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अक्षय महादेव नलवडे वय २७ वर्षे, रा. साखराळे ता. वाळवा जि. सांगली असे याप्रकरणी अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचनेनुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या कार्यालयातील पोलीस पथकाने केली.
या पोलीस पथकात पो. नि. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सपाटे, हवालदार महेश लावंड, असिफ जमादार, सागर बर्गे, दिपक कोळी, तानाजी बागल, अनिकेत पवार, गणेश बाकले, महिला पोलीस दिपाली पाटील सहभागी झाले होते.